राज्याची हरित ऊर्जा क्षेत्रात नवी भरारी ११ हजार मेगावॅट वीज निर्मिती होणार उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा पुढाकार-NNL


मुंबई।
 महाराष्ट्राची विजेची गरज भागविणारा अतिशय महत्त्वाचा निर्णय ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी घेतला असून येत्या ५ वर्षात राज्यात तब्बल ११ हजार मेगावॅट विजेची निर्मिती होणार आहे. अदानी उद्योग समुहातर्फे ही वीज निर्मिती केली जाणार आहे.

जागतिक आर्थिक परिषदेत ५० हजार कोटींची गुंतवणूक खेचून आणणारे ऊर्जा मंत्री डॉ. राऊत यांनी यानंतर अवघ्या महिनाभरात पुन्हा ६० हजार कोटींची गुंतवणूक क्षेत्रात आकर्षित करण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे लवकरच राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात १ लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

राज्य सरकारचा ऊर्जा विभाग आणि अदानी ग्रीन एनर्जी समूह (एजीईएल) यांच्यात आज ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत व ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण असा सामंजस्य करार करण्यात आला. अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात व हरित ऊर्जा क्षेत्रात नवी उंच भरारी घेणारा हा निर्णय असल्याची प्रतिक्रिया मंत्री डॉ.राऊत यांनी या करारानंतर व्यक्त केली.

अलिकडेच उन्हाळ्यात जाणवलेली वीज आणि कोळसा टंचाई यामुळे राज्यावर भारनियमनाचे संकट आले होते. मात्र प्रभावी व्यवस्थापन आणि नियोजन यांच्या माध्यमातून राज्य सरकारने राज्यातील भारनियमन टाळण्यात यश मिळविले. या पार्श्वभूमीवर राज्यात अतिरिक्त विजेची उपलब्धता व्हावी म्हणून ऊर्जा मंत्री डॉ.राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ऊर्जा विभाग प्रयत्नशील आहे.

या करारानुसार अदानी ग्रीन एनर्जी कंपनीतर्फे राज्यात पम्पड स्टोरेज प्रोजेक्टस (पीएसपी – Pumped Storage Projects) उभारले जाणार आहेत. आगामी चार ते पाच वर्षात अदानी समुह सुमारे ६० हजार कोटींची गुंतवणूक या प्रकल्पांमध्ये करणार आहे. यामुळे ३० हजार रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच या पीएसपींच्या माध्यमातून ११ हजार मेगावॅट वीज निर्मिती केली जाणार आहे. अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांच्या मदतीने वीज निर्मिती वा वीज संचय करणाऱ्या या प्रकल्पांचे अनेक लाभ राज्याला होणार आहेत. विशेषतः वीज टंचाईच्या स्थितीत तत्काळ वीज निर्मितीसाठी हे प्रकल्प उपयुक्त ठरणार आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागाचे उपसचिव नारायण कराड व अदानी उद्योग समुहाचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट अजित बारोडिया यांनी प्रतिनिधी म्हणून या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.  राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत व ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव श्री. वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महत्त्वपूर्ण करार करण्यात आला. ऊर्जा विभागाचे उपसचिव नारायण कराडअवर सचिव नानासाहेब ढाणे, अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट अजित बारोडियाअसोसिएट वाईस प्रेसिडेंट अक्षय माथुर यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी