नांदेड। सिटू कामगार संघटनेच्या स्थापना दिनी अर्थातच ३० मे रोजी वेळ सकाळी ११ वाजता पासून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर बेमुदत उपोषण व धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते. नांदेडचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांच्या लेखी पत्रामुळे ते आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केले असल्याचे माकप सचिव कॉ.गंगाधर गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
महागाई व वाढत्या बेरोजगारीस आळा घालावा.नांदेड जिल्ह्यातील सह निबंधक दुय्यम निबंधक तसेच इतर दोषींवर निलंबनाची कारवाई करावी आणि गुन्हे दाखल करावेत. माहूर देवस्थान जमीन घोटाळ्याची व देवस्थान जमिनीची विक्री करणाऱ्यांची योग्य चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करावेत. देवस्थानची जमीन विक्री होऊ नये म्हणून वझरा ता. माहूर गावापासून पाचशे मीटर जमीन शासनाने ताब्यात घेऊन तार कंपाउंड करावे. गंगाधर गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या वर कारवाई करून संरक्षणाची जबाबदारी शासनाने घ्यावी. मौजे खुरगाव नांदुसा आणि चिखली ता. जि. नांदेड येथील अर्जदार महिलांना घरकुल व लघु उद्योगासाठी रुपये दोन लाख कर्ज देण्यात यावे. नांदेड शहरातील बोगस शिक्षण संस्था प्रजा बालक विद्या मंदिर गांधी नगर या शाळेवर व संचालक मंडळावर कठोर कारवाई करावी.
गांधीनगर मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेच्या मोकळ्या जागेमध्ये शिक्षण संस्थेच्या जावयाने अवैध बंगला बांधला आहे. त्यावर योग्य कारवाई करून शिक्षिका आशा माधव गायकवाड यांनी केलेल्या कामाचा मोबदला देण्यात यावा. मौजे टेंभुर्णी ता. नायगाव येथील अवैद्य विटभट्टी मालक भास्करे यांनी कामगारांच्या शिक्षण घेत असलेल्या मुलास टेम्भूरणी ता. नायगाव येथे डांबून ठेवले होते त्याची सुटका करावी. मौजे दैठना येथील घरकुल घोटाळ्याची चौकशी करून कारवाई करावी.आदी मागण्या घेऊन बेमुदत उपोषण व धरणे आंदोलन सूरु केले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील दंडाधिकारी शाखेचे कर्मचारी बालाजी जाधव व राजू गायकवाड यांनी आंदोलकांशी योग्य चर्चा करून समन्वय साधत आंदोलन थांबविण्यात यश मिळवले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुद्रांक महानिरिक्षक पुणे, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. नांदेड, पोलीस अधीक्षक नांदेड, आयुक्त मनपा नांदेड, शिक्षणाधिकारी (प्रा.)जि.प.नांदेड, तहसीलदार माहूर व इतरांना योग्य कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत काढले असल्यामुळे उपरोक्त आंदोलनास तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. सदरील उपोषण व धरणे आंदोलनात कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ.उज्ज्वला पडलवार,कॉ. करवंदा गायकवाड, कॉ.मारुती केंद्रे, कॉ.लता गायकवाड, सं.ना. राठोड, पीडित सहशिक्षिका आशा महादेव गायकवाड, शामराव वाघमारे, छबुताई वाघमारे, कॉ.मीना आरसे आदींचा सहभाग होता.
वीटभट्टी मालकाने बंधक करून तथा डांबून ठेवलेल्या वीटभट्टी कामगारांच्या शिक्षण घेत असलेल्या मुलाची सुटका करण्यात माकपा ला यश आले असून जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व तहसीलदार नायगाव यांनी तातडीने दखल घेत सुटका करण्यासाठी सहकार्य केले आहे. परंतु अवैध व विनापरवाना वीटभट्टी मालकावर कारवाई करण्यासाठी माकप पाठपुरावा करणार असून, जिल्हा प्रशासनास लेखी आश्वासनाचा विसर पडल्यास पुढील पंधरवड्यात यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असे माकप सचिव कॉ.गंगाधर गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.