बिलोली। येथील नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्यामुळे काळजीवाहू नगराध्यक्षाकडे लोकांच्या मोठ्या प्रमाणात अपेक्षा वाढल्या आहेत. असे असताना काळजीवाहू नगराध्यक्ष दिलेले शहराच्या सोयी सुविधेकडे तीळमात्र लक्ष देत नसल्याचे चित्र दिसून आले.
बिलोली येथील नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ 17 फेब्रुवारी 2022 रोजी संपला यानंतर संबंधित उपजिल्हाधिकारी यांना काळजीवाहू नगराध्यक्ष पदाचा पदभार देण्यात आला. उपजिल्हाधिकारी स्तरीय अधिकारी हे तोंड चोपड्या पदाधिकाऱ्यापेक्षा प्रभावी कार्य करतील अशी अपेक्षा जनतेतून होती. मात्र काळजीवाहू नगराध्यक्ष तथा उपजिल्हाधिकारी हे बिलोली शहरातील नागरिकांचे विशेष लक्ष देणे तर दूरच गाऱ्हाणे मांडणाऱ्यांसाठी सुद्धा वेळ देत नसल्याची बाब शहरातील नागरिकांनी व्यक्त केली.
बिलोली शहरातील विविध भागात अस्वच्छता दूर करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी विशेष पाऊल उचलले असले तरी अनेक ठिकाणी अजून स्वच्छता करण्याची गरज असल्याचे चित्र दिसून आले. नगराध्यक्ष हे मुख्याधिकाऱ्यांना सूचना करून काम करून घेणे क्रमप्राप्त आहे. नगराध्यक्षालाच लोकांच्या अडचणी माहीत नसल्यामुळे सर्व कारभार अलबेल सुरू आहे.अशी प्रतिक्रिया माजी आमदार तथा माजी नगराध्यक्ष गंगाधरराव पटणे यांनी माध्यम प्रतिनिधींकडे व्यक्त केली आहे. एकंदरीत काळजीवाहू नगराध्यक्षांकडून मोठ्या प्रमाणात असलेल्या अपेक्षांचा भंग झाला आहे.