नांदेड। सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने संपूर्ण देशभरात ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या निवारण करण्यासाठी व सहाय्यासाठी एल्डर लाईन 14567 ची सुरुवात करण्यात आली आहे. राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फॉउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची राष्ट्रीय हेल्पलाईन (एल्डरलाईन - 14567) जनसेवा फॉउंडेशन तर्फे चालविण्यात येत आहे.
यात ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या निवारण करण्यासाठी हेल्पलाईन कनेक्ट सेंटर, फिल्ड टीम, विविध शासकीय यंत्रणा, पोलीस प्रशासन, विविध ज्येष्ठ नागरिक संघटना, विविध स्वयंसेवी संस्था, कायदेविषयक सल्लागार, समुपदेशक, स्वयंसेवक आदींच्या सहभागातून हे काम चालू आहे.
हेल्पलाईन मार्फत माहिती, मार्गदर्शन, भावनिक आधार आणि क्षेत्रीय पातळीवर मदत या चार टप्यात काम चालू असून यात माहिती क्षेत्रात - आरोग्य, जागरूकता, निवारा/वृद्धाश्रम, डे-केअर सेंटर, ज्येष्ठासंबंधि अनुकूल उत्पादने, सांस्कृतिक, अध्यात्मिक कला-करमणूक ई. मार्गदर्शन - कायदेविषयक, आर्थिक, पेन्शन संबंधित, सरकारी योजना ई. भावनिक आधार - चिंता, निराकरण, नातेसंबंध विषयक व्यवस्थापन, मृत्यूशी संबंधित शोक, जीवन व्यवस्थापन, मृत्यू पूर्वीचे दस्तऐवजीकरण ई. क्षेत्रीय पातळीवर मदत - बेघर, अत्त्याचारग्रस्त वृद्द व्यक्तींची सेवा व काळजी घेण्यासाठी हेल्पलाईन कार्यरत आहे.
एल्डरलाईनचा टोल फ्री क्रमांक 14567 असा असून हेल्पलाईनची वेळ सकाळी 08:00 पासून ते संध्याकाळी 08:00 पर्यंत असून आठवड्यातील सर्व दिवस हेल्पलाईन कार्यरत आहे. तरी अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांनी सदर हेल्पलाईनचा लाभ घ्यावा असे आवाहन उ.मराठवाडा ज्येष्ठ नागरिक संघटना (फेस्कॉम)चे अध्यक्ष अशोकजी तेरकर यांनी केले आहे.