मराठा आरक्षणप्रकरणी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात गृहमंत्र्यांनी घेतला आढावा -NNL


मुंबई। 
मराठा आरक्षण प्रकरणी आंदोलकां वरील दाखल गुन्हे मागे घेण्याची कार्यवाही शासनामार्फत सुरु आहे. संबंधित जिल्ह्याचे पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांनी आढावा घेऊन या संदर्भातील माहिती तात्काळ सादर करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज दिले.

मंत्रालयात गृहमंत्री यांच्या दालनात मराठा आरक्षणप्रकरणी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अपर मुख्य सचिव गृह आनंद लिमये, अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) कुलवंत कुमार सरंगल, प्रधान सचिव संजय सक्सेना,  सामाजिक न्याय सचिव सुमंत भांगे यांच्यासह मराठा संघटनांचे प्रतिनिधी विनोद साबळे, संजीव भोर, तुषार जगताप, अंकुश कदम, राजेंद्र लाड उपस्थित होते.

यावेळी गृहमंत्री श्री. वळसे-पाटील यांनी मराठा आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घेण्याच्या कार्यवाहीचा आढावा घेतला. कोपर्डीसह अन्य प्रलंबित प्रकरणांचा सविस्तर आढावा घेवून आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

मराठा संघटनांचे प्रतिनिधी आणि शासन यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी नेमलेल्या अधिकारी यांनी या सर्व प्रतिनिधींसोबत योग्य तो समन्वय ठेवावा यासाठी निर्देश दिले. तसेच प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी आवश्यक ती सर्व प्रशासकीय  कार्यवाही प्राधान्याने करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. एसईबीसी आरक्षणातील मराठा उमेदवारांच्या रखडलेल्या नियुक्त्यांचा विषय तसेच आरक्षणाची सद्यस्थिती या विषयावर यावेळी  सविस्तर चर्चा झाली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी