आ. बालाजी कल्याणकर यांच्यामुळे दीड लाख लोकांना आरोग्य सेवा उपलब्ध होणार- पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे -NNL

वाडी बु. येथे उपजिल्हा रुग्णालयाचे मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन


नांदेड, आनंदा बोकारे।
मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे आव्हान परतवून लावण्यासाठी राज्यातील आरोग्याच्या सेवा-सुविधा भक्कम करणे आणि दुसऱ्या बाजुला राज्याच्या कानाकोपऱ्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे यावर आपल्या महाविकास आघाडी सरकारने भर दिला. हे करत असतांना सर्वसामान्यांच्या हिताचे जे वचन आम्ही दिले त्याची पूर्तता करण्याची पराकाष्टा आम्ही घेत आहोत. नांदेड येथील उपजिल्हा रुग्णालयाचे हे भूमिपूजन त्याचेच द्योतक असून आ. बालाजी कल्याणकर यांच्यामुळे दीड लाख लोकांना आरोग्य सेवा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पर्यटन तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.

वाडी (बु.) येथे नांदेड उपजिल्हा रुग्णालयाच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आरोग्य मंत्री राजेश टोपे, खा. हेमंत पाटील, खा. संजय जाधव, आ. बालाजी कल्याणकर, आ. संतोष बांगर, महापौर जयश्री पावडे, मा. मंत्री कमलकिशोर कदम, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, मंहत जिवनदास महाराज चुडावेकर, युवासेना विस्तारक अमित गीते, मा.आ. अनुसया ताई खेडकर, रोहिदास चव्हाण, नागेश पाटील आष्टीकर, शिवालय प्रतिष्ठाणच्या अध्यक्षा संध्याताई कल्याणकर, जिल्हाप्रमुख  दत्ता पाटील कोकाटे, उमेश मुंडे, आनंदराव बोंढारकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर, अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे, कार्यकारी अभीयंता तोदले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर, मा. जि.प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, जयवंत कदम, बाबुराव मोरे, तात्या पावडे, सरपंच अश्विनी लोखंडे, उपसरपंच साधना पावडे, अशोक उमरेकर, प्रकाश मारावार, निखील लातुरकर, भुजंग पाटील, पप्पु पाटील, माधव पावडे, गजानन कदम, व्यंकटेश मामीलवाड, बालाजी शिंदे, कृष्णा अष्टीकर, सचिन किसवे, तूलजेश यादव, बंडु पावडे, बाळासाहेब पावडे, बाळासाहेब देशमुख,  नारायण कदम यांच्यासह वाडी येथील सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.


राज्याच्या सामान्यातील सामान्य जनतेशी बांधिलकी ठेऊन आम्ही विकास कामांकडे व्यापक दृष्टिकोणातून पाहत आहोत. आव्हाने अनेक आहेत. नैसर्गिक आव्हानांची यात भर पडत चालली आहे. पाण्याचे दुर्भीक्ष, वातावरणातील बदल, वाढती उष्णता हे प्रश्न डोळ्यापुढे ठेऊन भविष्यातील महाराष्ट्राचे नियोजन करावे लागणार आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रत्येक विभागाला एक समर्थ नेतृत्व लाभलेले आहे. आपल्या अनुभवाच्या, कौशल्याच्या बळावर राज्याच्या विकासाचा मार्ग आम्ही अधिक भक्कम करू, असा विश्वास पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

या राज्यातील शेतकऱ्यांना विकासाच्या प्रवाहात घेण्यासाठी शासनाने कोणतीही कमतरता ठेवली नाही. आपल्या बळीराजाला कर्ज मुक्त करण्याचे आम्ही वचन दिले होते. कोरोना सारख्या आव्हानातही आम्ही ते पाळले. कोरोना नंतर आरोग्यसेवा वाढविण्याची गरज होती, हीच बाब लक्षात घेऊन नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव आरोग्यविभागाकडे दाखल केला. त्यासाठी वेळोवेळी मी सुध्दा संबंधीतांना सुचना केल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच राज्यात सध्या हनुमान चालीसा चा मुद्दा गाजत असतानाच, येथे आदित्य ठाकरे यांनी आम्हाला कोणी हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही, प्राण जाये पर वचन ना जाये, हेच आमचे हिंदुत्व असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे- नांदेड जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिने परिपूर्ण वैद्यकीय सेवा-सुविधा असाव्यात यावर आरोग्य विभागानेही लक्ष दिले आहे. उपजिल्हा रुग्णालयाची मागणी ही जिल्ह्यासाठी आवश्यक असून आता या नवीन रुग्णालयामार्फत अधिकाधिक लोकांच्या आरोग्याची काळजी घेता येईल, त्यांच्यावर उपचार करता येतील. ग्रामीण भागाच्यादृष्टिने हे उपजिल्हा रुग्णालय महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला. व्हिडिओ कॉन्फरसिंन्सगद्वारे त्यांनी या उद्घाटन सोहळ्यात सहभाग घेऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत - सवंग लोकप्रियतेपेक्षा सर्वसामान्य जनतेला ज्या सुविधा गरजेच्या आहेत, ज्या सुविधा आवश्यक आहेत त्या जाणून घेऊन, त्याबाबत सर्वसामान्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी विचारविमर्ष करून त्या योजनांसाठी झटणारे आमचे आ. बालाजी कल्याणकर आहेत. या शब्दात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आ. बालाजी कल्याणकर यांचे कौतूक केले. फार आवश्यकता जर कुठे असेल तरच आक्रमकपणा व ऐरवी सदैव संयमीपणा ठेवल्याने कल्याणकरांची उपजिल्हा रुग्णालयाची मागणी शासनाने मान्य करण्यात कोणती कसूर ठेवली नसल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.

खा. हेमंतभाऊ पाटील- नांदेड हे आरोग्याच्या सेवा-सुविधांबाबत एक हब म्हणून नावारुपास आले आहे. यात शासकीय रुग्णालयापासून येथील वैद्यकिय महाविद्यालयाने विश्वासर्हता निर्माण केली आहे. याच बळावर नांदेड येथे केवळ नांदेड जिल्ह्यातीलच नव्हे तर शेजारील हिंगोली, परभणी या व इतर जिल्ह्यातूनही उपचारासाठी रुग्णांचा इकडे ओढा आहे. आ. बालाजी कल्याणकर यांनी मंजुर करुण आणलेल्या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन झाले आहे. ते रुग्णालय पुर्णा, वसमत या तालुक्यांनाही आता अधिक सोईचे ठरणार असल्याने या भागातील लोकप्रतिनिधी म्हणून मला आनंद असल्याचे प्रतिपादन खा. हेमंतभाऊ पाटील यांनी केले.

आ. बालाजी कल्याणकर- नांदेड जवळील वाडी बु. परिसर, निळा, लिंबगाव, रहाटी, मालेगाव रोड, पासदगाव, कासारखेड, पुर्णा रोड, भावसार चौक, फरांदेनगर, पावडेवाडी या भागातील जवळपास 1 ते दीड लाख नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी विष्णुपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाकडे जाणे हे मोठ्या कसरतीचे आहे. या भागातील लोकांना आपल्या जवळपास रुग्णालयाची सुविधा असावी ही रास्त मागणी होती. सर्वसामान्यांच्या भावना लक्षात घेऊन या रुग्णालयासाठी आम्ही धरलेला आग्रह शासनाने मान्य करून युद्ध पातळीवर यासाठी जागाही उपलब्ध करून दिली. सर्वसामान्य लोकांच्या सेवेकरीता आता एक नवीन सुविधा लवकरच उपलब्ध होत आहे, याचा मनस्वी आनंद असल्याच्या भावना आ. बालाजी कल्याणकर यांनी व्यक्त केल्या.

मा. मंत्री कमल किशोर कदम - यावेळी माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी आ. कल्याणकर यांच्या कार्यशैलीचे कौतूक केले. आम्हाला पंचवीस वर्षात जमले नाही, ते आ. कल्याणकर यांना जमले. या भागात खरोखरच रुग्णालयाची गरज होती. ती आ. बालाजी कल्याणकर यांनी अवघ्या अडीच वर्षात पूर्ण केली, असे गौरवोद्गार मा. मंत्री कमल किशोर कदम यांनी काढले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी