नांदेड| लोकसेवा हमी कायद्यांतर्गत प्रभावी सेवा प्रदान करण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि शाळा स्तरावर मुख्याध्यापकांनी लोकांच्या सर्व समस्यांचे निराकरण विहित कालमर्यादेत करणे बंधनकारक असून प्राप्त प्रकरणांवर आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याचे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.सविता बिरगे यांनी आज केले.
येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सभागृहात शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, तालुका स्तरावरील गटशिक्षणाधिकारी यांचे लोक सेवा हमी कायद्यासंदर्भातील एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना त्यांनी जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाच्या सर्व संचिकावर वेळेत कार्यवाही होऊन निकाली निघतील, तसेच तक्रार अर्जांचा निपटारा विहित कालावधीत होईल अशा पद्धतीने सूक्ष्म नियोजन करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी लोकसेवा हमी प्रश्नी स्वतंत्र बैठक घेऊन सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना सर्व प्रकरणे विहित कालावधीत पूर्ण करण्याबाबत निर्देशीत केले होते. त्यानुसार या प्रशिक्षणाचे जिल्हास्तरावर आयोजन करण्यात आले. अशी प्रशिक्षणे तालुकास्तर आणि शाळा स्तरावरही आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच सर्व प्रकरणांचा निपटारा वेळेच्या आत होतो आहे की नाही हे पाहण्यासाठी एक कार्यबल गटही तयार करण्यात येणार आहे.
लेखाधिकारी योगेश परळीकर, शिक्षण विस्तार अधिकारी संतोष शेटकार, सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ.विलास ढवळे, पर्यायी शिक्षण प्रमुख डॉ. डी.टी.शिरसाट, प्रोग्रामर के.ए.काझी यांनी यावेळी माहिती दिली. कार्यक्रमाचे नियोजनात सहायक कार्यक्रम अधिकारी अर्चना बागवाले, गणेश शिंदे, शशिकला दावगरवार, मीनल देशमुख, दिलीप मोकले, प्रकाश गोडणारे यांनी परिश्रम घेतले. प्रशिक्षणात शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी तसेच गटशिक्षणाधिकारी यांची उपस्थिती होती.