अहवाल चुकीचा की कार्यवाही खोटी? याविषयी तर्कवितर्क
बिलोली| तहसिलदार व पोलिस निरीक्षक बिलोली पोलिस स्टेशन यांनी दिलेला अहवाल व रेती ठेकेदाराने सादर केलेला खुलासा ग्राह्य धरत बिलोलीचे उप विभागीय अधिकारी सचिन गिरी यांनी दि.१२ मे च्या राञी सहाय्यक पोलिस अधिक्षक अर्चीत चांडक यांनी कारवाई केलेली ३८ वाहने व चार जेसीबी यंञांवर कोणतीही दंडात्मक कारवाई न करता सोडण्याचे आदेश दि.१८ मे रोजी दिले आहेत. अहवाल चुकीचा की कार्यवाही खोटी? याविषयी तर्कवितर्क सुरू आहेत.
दि.१२ मे च्या मध्यराञी बिलोली उप विभागाचे सहाय्यक पोलिस अधिक्षक अर्चीत चांडक यांनी आपल्या ताफ्यासह बिलोली तालुक्यातील सगरोळी २ या रेती घाटावर छापा टाकत रेतीने भरलेल्या ३८ वाहनांसह ४ जेसीबी यंञावर कारवाई केली होती.याबाबत सर्वच वर्तमानपञांत वृत्त प्रकाशीत झाले होते.चांडक यांनी कारवाई केलेली वाहने पुढील दंडात्मक कारवाई साठी महसुल विभागाच्या ताब्यात दिले होते.
पुढील कारवाईच्या अनुषंगाने उप विभागीय अधिकाऱ्यांनी बिलोलीचे तहसिलदार व पोलिस निरीक्षक यांना अहवाल व रेती ठेकेदारास खुलासा सादर करण्याबाबत कळवले होते.त्यानुसार तहसिलदार श्रीकांत निळे व पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांनी दिलेला अहवाल तसेच सगरोळी २ रेती घाटाचा ठेकेदार शेख अलिम अमिरसाब रा.अटकळी यांनी सादर केलेल्या खुलाश्या वरून दोन दिवसात झालेला मुसळधार पावसामुळे रस्त्यावर चिखल झाल्याने वाहने अडकली.
अन ही अडकलेली वाहने काढण्यासाठी चार जे.सी.बी आनल्याचे सांगण्यात आल्यावर उप विभागीय अधिकारी सचिन गिरी यांनी चांडक यांनी कारवाई केलेली सर्व ३८ वाहने व चार जे.सी.बी यंञ कोणताही दंड न लावता सोडण्याचे आदेश दिले आहेत. सदर आदेश पाहता काहीतरी गडबड आहे हे स्पष्ट होते आहे. आयपीएस अधिकारी अर्चित चांडक यांची कारवाई चुकीची का अहवाल चुकीचा? यावर तर्कवितर्क सुरू आहेत. एवढेच नव्हे तर दबावतंत्राचा माध्यमातून गौडबंगाल सुरू असल्याची चर्चा जोमाने सुरू आहे.