उस्माननगर, माणिक भिसे। कवितेच्या अंगाने पाहिले असता आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र सीमेवर असलेल्या धर्माबाद परिसरातील बोली भाषेच्या भाषिक सौंदर्याने नटलेल्या कवितांचा नाद - लय कधीही न सोडणारा अधिकाधिक काळ कवी आणि सर्वसामान्य माणूस थोडावेळ अशी साहित्य क्षेत्रात ओळख असलेले प्रा.डॉ.विश्वनाथ रत्नाळीकर म्हणजे साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील सुरेख संगम आहे असे मा. देविदासजी फुलारी म्हणाले. प्रा रत्नाळीकर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त घेण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
गोदावरी मनार चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शंकरनगर ता. बिलोली येथून तीस वर्ष प्रदीर्घ सेवा करून सेवानिवृत्त झालेले प्रा.डॉ.विश्वनाथ रत्नाळीकर यांचा विद्यार्थी, मित्र परिवार व आप्तेष्टांच्या वतीने सत्कार समारंभ घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्र कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्रजी शिंदे तर व्यासपीठावर सुप्रसिद्ध साहित्यिक देविदास फुलारी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव मा.श्री.दिगंबर तंगलवाड, आदर्श शिक्षक शा. शं. जहागीरदार, उत्सवमूर्ती श्री विश्वनाथ रत्नाळीकर व सौ. नीलिमा वि. रत्नाळीकर उपस्थित होते.
पुढे बोलताना देवीदास फुलारी म्हणाले की, माझा बालमित्र रत्नाळीकर विनोद, गांभीर्य व माणुसकीचा गहिवर याचे मूर्तीमंत उदाहरण असून त्याच्यासारखा निष्कलंक व चारित्र्यसंपन्न मित्र मिळणे कठीण आहे. विशेष म्हणजे त्यांना आयुष्यात कधी राजकारण करताच आले नाही. शामसूंदरराव जहागीरदार यांनी आपल्या भाषणात सद्यस्थितील शिक्षकांचे प्रकार सांगून रत्नाळीकर हे शिक्षण, साहित्य अशा विविध क्षेत्रात स्वच्छ मनाने कार्य करतांना संस्थेच्या विचारांशी एकनिष्ठ राहून विद्यार्थ्यांचे हिताचे काम प्रामाणिकपणे करत गृह मंडळातील हवाहवासा वाटणारा गुरु केव्हा झाले हे कळले नाही असे गौरवोद्गार काढले.
तर उपकुलसचिव म्हणाले की रत्नाळीकर हे संस्थेतील पायाभूत रत्न असून कोरोणा सारख्या महामारी च्या काळात संस्थेतील सहकारी व विद्यार्थ्यांची वेळोवेळी आस्थेवाईकपणे चौकशी करून प्रत्येकाला मानसिक आधार दिला. कार्यक्रमात तुकाराम नरवाडे, पल्लवी जोशी पांडे, ऍड. चंद्रकांत जहागीरदार, राजेश्वर कुलकर्णी व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना प्रा. रत्नाळीकर म्हणाले की पोस्ट ऑफिस, प्राध्यापक, उपप्राचार्य ते कवी हा प्रवास मी खतगावकर परिवाराच्या सहकार्या मुळेच यशस्वीरित्या पूर्ण करू शकलो त्यामुळे मी सदैव त्यांचा ऋणी राहील.
तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते प्रा. रत्नाळीकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारा विश्र्वांगण ह्या विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या गौरव अंकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रस्ताविक योगेश रत्नाळीकर यांनी केले तर आभार मंगेश रत्नाळीकर यांनी मानले. कार्यक्रमाचे बहारदार संचलन पल्लवी योगेश रत्नाळीकर यांनी केले. सोहळ्याला मित्रपरिवार, विद्यार्थ्यांसह नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.