नांदेड| बुद्ध भीम गितांच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळ गतिमान करणारे आणि आंबेडकरी निष्ठेने आपले संपूर्ण आयुष्य समाजप्रबोधनासाठी वेचणारे 'जलसाकार' वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शहरात महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी यशदा पुणे येथील अधिकारी, आंबेडकरी विचारवंत साहित्यिक डॉ. बबन जोगदंड यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष बालाजी इबितदार, निमंत्रक जी. पी. मिसाळे आणि संयोजन समितीचे अध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे यांनी दिली.
सत्यशोधक फाऊंडेशन आणि मानव विकास सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शहरातील कुसुम सभागृहात महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी पुण्यातील महाराष्ट्र शासनाच्या 'यशदा' या शिखर प्रशिक्षण संस्थेतील अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांची निवड करण्यात आल्याची घोषणा विसावा पॅलेस येथे पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी राज गोडबोले, प्रभु ढवळे, कोंडदेव हटकर, अशोक मल्हारे, मारोती कदम, नागोराव डोंगरे, एन. टी. पंडित, भीमराव हटकर आदींची उपस्थिती होती.
डॉ. बबन जोगदंड यांचा अनेक सामाजिक, धार्मिक कार्यात मोठा सहभाग आहे. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यानाही ते सातत्याने मार्गदर्शन करतात. त्यांनी अनेक मासिके, वर्तमानपत्राच्या माध्यमातून विविध विषयावर विपुल लेखन केले आहे. त्यांचा अनेक विषयांचा अभ्यास असून विशेषतः फुले - आंबेडकरही चळवळीचे ते भाष्यकार आहेत. त्यांची आतापर्यंत अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहे. त्यात युगपुरुष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विविध पैलू आणि आंबेडकरी चळवळ, आम्ही पाहिलेले बाबासाहेब : प्रज्ञासूर्याच्या प्रकाशात, यशाचा सहजयोग, कृषि संवादक महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक तत्वज्ञान, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक क्रांतीचे तत्वज्ञान यांचा समावेश आहे.
डॉ. जोगदंड यांनी सहा विषयात एम.ए., एमबीए आणि एलएलबी आणि पीएचडी केलेली आहे. पत्रकारितेतही त्यांनी पीएचडी ही पदवी संपादन केली आहे. सर्वाधिक पदव्यांचे मानकरी म्हणून त्यांची इंडिया बुक आॅफ रेकाॅर्डमध्ये नोंद झाली आहे. अनेक पुरस्कारानेही ते सन्मानीत असून त्यांचा व्यापक जनसंपर्क आहे. त्यांच्यावर 'द किंग ऑफ ह्युमन नेटवर्किंग' हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.