महात्मा बसवेश्वर आणि शरण संस्कृती -NNL


भारतीय साहित्याच्या इतिहासामध्ये संत साहित्याची अध्ययन करीत असताना दक्षिण साहित्य तेलुगु , कन्नड , मल्याळम , तमिळ इ. भाषेच्या योगदानामुळे समृद्ध झालेले आहे. या भाषेतील साहित्याची वैचारिक प्रगल्भता " द्रविडी संस्कृतीची " प्रचिती करून देणारी आहे. या भाषेच्या अतुलनीय योगदानात अनेक संत साहित्याच्या विचारवंताचे कार्य परिसाप्रमाणे आहे. या युगपुरुषांच्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यातील उनाड माळरानावर हिरवळीने आच्छादलेले नंदनवन तयार करण्याचे कार्य वेळोवेळी अनेक जण केलेले आहेत. मध्ययुगीन साहित्याच्या अभ्यासात विशेषतः बाराव्या शतकात कर्नाटकामध्ये खूप मोठी क्रांती झाली जी क्रांती " शरण संस्कृती " या नावाने ओळखली जाते. ही क्रांती अहिंसात्मक स्वरूपाची खूप मोठी क्रांती होती. 

ज्यामुळे अनेक राजे , महाराजे , जमीनदार लोकांचे धाबे दणाणले होते . कारण या शरणांचे नैतिक वजन इतके मोठे होते की, त्यांच्यासमोर धन ,पैसा , पद हे सर्व गौण होते. जगाच्या इतिहासातील सर्वप्रथम अहिंसात्मक पद्धतीने केले जाणारे आंदोलन शरण संस्कृतीचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यापूर्वी आणि नंतर अनेक रक्तरंजीत क्रांत्या वेळोवेळी झाले मात्र त्यामध्ये अनेक निरापराध्यांचा नाहक बळी घेण्यात आलेला आहे. परंतु भारतीय इतिहासात अशी एकमेव घटना घडली ज्यामध्ये अनेक दुःखी , कष्टी , पीडित लोकांना सन्मान मिळवून देण्याचा गौरवमय इतिहास रचला गेला. जे भारतीय इतिहासातील ' सुवर्णयुग ' आहे. या काळामध्ये समाजात पसरलेल्या स्वार्थ , षड्यंत्र , अयोग्य घटनांचे स्तोम माजलेले होते. या व्यवस्थेला वेळीच आळा घालण्यासाठी क्रांतीसूर्य , समाजसुधारक , युगपुरुष , विश्व मानवतावादी , विचारवंत , चिंतक व थोर संत बसवेश्वर यांचा उदय झाला.

विश्व मानवतावादी संत बसवेश्वर हे तळागळातल्या समाजाला एकत्रित करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य केले. बसवेश्वरापूर्वी कोणीही दीन , दलित , पीडित , उपेक्षितांना इतक्या प्रेमाने जवळ करण्याचे कार्य केले नव्हते. गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर सारख्या युगपुरुषांनी समाज परिवर्तनाची मोठी ज्योत पेटवली होती. पाखंडी समाज व्यवस्थापकांनी वेळोवेळी घात करून ती मशाल शांत करण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होते. बसवेश्वर यांच्यासारख्या क्रांतिकारी विचारवंतांनी ती मशाल पुन्हा अधिक समर्थपणे पेटवण्याचे कार्य केलेले आहे. बसवण्णा हे आपल्या शरणांना ( सद्भक्तांना ) कधीच कोणतीही गोष्ट बंधनकारक करीत नव्हते. ते सदैव प्रत्येकाला विवेकशील बनून विचार करण्यास भाग पाडत होते. ज्यामधून विवेकशील समाजाची निर्मिती होत होती. या समाजाला आचार आणि विचारांची योग्य सांगड घालण्याची शिकवण दिली गेली. यावेळी शरणांच्या संस्कृतीमध्ये स्वतःमध्ये सुयोग्य बदल घडवण्यासाठी धडपड सुरू होती. या काळामध्ये शरण संस्कृती जपणाऱ्याला मनुवाद्याकडून अनेक त्रास दिले जात होते. परंतु बसवेश्वरांनी उभारलेल्या कार्याची उंची इतकी मोठी होती की, अशा तुच्छ वाटणाऱ्या कार्याला वेळीच मूठमाती देण्यामध्ये बसवेश्वर यशस्वी झाले होते. बसवेश्वरांनी माणसाला माणूस बनवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते . त्यांच्या या कार्याची ध्वज पताका सर्वदूर पर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची मोठी बहीण नागांबिका , पत्नी गंगांबिका , निलांबिका यांच्यासारखे असंख्य अनुयायी कार्य करीत होते.

वर्णव्यवस्था व जातीवादी लोकांनी समाजात दरी आणि आपापसात तेढ निर्माण करून दिली होती.चातुर्वर्ण्यामध्ये शूद्र व पंचम वर्ग जो अतिशूद्र नावाने ओळखला जात होता . त्यांना स्वाभिमानाने जगण्यासाठी बसवेश्वरांनी आपल्या हृदयाशी घट्ट कवटाळले होते. या समाजातील वाईट विचारांना मिटवण्यापूर्वी ' ईष्टलिंग ' पूजा करण्याचे महत्व प्रतिपादित केले. मंदिरातल्या देवामुळे समाजामध्ये पुरोहितशाही आणि श्रीमंताचे घरे भरण्याचे काम चालू होते. जे आज ही तंतोतंत सुरूच आहे. ते थांबविण्यासाठी ' देह हेच देवालय ' ही संकल्पना मांडण्यात आली. यामुळे लिंग आणि अंग हे एकांग ठेवण्यासाठी प्रत्येकजण स्वतःबरोबर समाजात स्वच्छतेला महत्त्व देण्याचे कार्य करू लागले होते. समाज सुखी,समाधानी,ज्ञानी बनला होता. मनुवाद्यांनी ज्या देवाला कुलूपबंद करून ठेवले होते तोच देव आज जनसामान्यांच्या तळहातावर येऊन विराजमान होणे हे अतिशय आल्हाददायक वाटत होते. 'ईष्टलिंग ' धारण करणारा प्रत्येक पुरुष 'शरण' आणि स्त्री 'शरणी' या नामाभिधानाने ओळखले जाऊ लागले. 

स्त्री-पुरुषातील कामवासनेची भावना उद्रेक होऊ नये यासाठीच ' अक्का - अण्णा ' ही बिरुदावली वापरण्यात येत होती. शरणांच्या संपर्कात येणारी स्त्री ही 'अक्का' म्हणजेच मोठी बहीण व पुरुष हा अण्णा म्हणजेच मोठा भाऊ असे परस्पर पारिवारिक स्नेहभाव वृद्धिंगत झालेला होता. बहीण भावामध्ये कधीच वासनात्मक प्रेम वाढणार नाही ही खूप मोठी शिकवण या संस्कृतीची आहे. स्त्री-पुरुष दोघेही अतिशय गुण्यागोविंदाने आपले जीवन जगत होते. हे सारे श्रेय बसवेश्वरांच्या अवैदिक आंदोलनातील यश होते. या महामानवाच्या पावन कार्याची संकल्पना ही व्यापक स्वरूपाची होती. संपूर्ण विश्वाची व्यापकता लक्षात घेऊनच ' ईष्टलिंग ' हेच सार्‍या विश्वाचे प्रतीक समजून कार्य करीत होते. समाजातल्या कूपमंडूक प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच शास्त्र ( ज्ञान) शिकवताना वचन साहित्याच्या माध्यमाने आचार विचारात बदल केला जात होता.

संत बसवेश्वर आणि त्यांचे समकालीन शरणांचा दृष्टीकोण हा एकमेकाविषयी अतिशय जिव्हाळ्याचे बनले होते. पती-पत्नी दोघेही या शरण संस्कृतीचे पाईक असल्यामुळे एक दुसऱ्याविषयी आपुलकी , जिव्हाळा कायम होता. या दोघांच्या आचरणात शुद्धता असल्यामुळेच त्यांच्या परिवारातील इतर सर्वजण त्यांचे आचरण करत होते. वर्तमान काळातील मुकी होत चाललेली घरे त्याकाळी सुसंवादाचे केंद्र बनत होते.या शरणांनी इतरांना सुद्धा आपुलकीने आपल्याच घरातील सदस्य मानून रक्तसंबंध यापेक्षाही मानलेले भावसंबंध पवित्र असू शकते याचे उत्तम उदाहरण या ठिकाणी पहायला मिळते. जे बसवेश्वर यांनी आपल्या वचनातून असे सांगितले आहे - 

             " हा कोणाचा हा कोणाचा

              हा कोणाचा न म्हणवी देवा

                हा आमचा हा आमचा

              हा आमचा म्हणावा हो

कुडलसंगम देवाचा घरचा सेवक म्हणावा हो. "

दुसऱ्याला ( परकियांना )सुध्दा आपले म्हणणारी ही संस्कृती आहे. ज्यामुळे जाती , धर्म , पंथाचे भेद विसरून समाज एका सूत्रांमध्ये बांधला जात होता. आज हे चित्र बदलून वेगवेगळ्या गटा - तटात ,झेंड्याखाली समाज विभागला जात आहे. बसवेश्वरांचे अनुयायीच विचारांची पडझड सुरू केलेली आहे. जे जगातल्या वाढणाऱ्या पाश्‍चात्त्य अंधानुकरणाचा अंगीकार करताना दिसत आहेत. आज महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न सर्वात महत्त्वाचा ऐरणीवर आहे. त्याकाळी कसलीच अत्याधुनिक व्यवस्था नसताना स्त्री-पुरुष अतिशय सुरक्षित होते.

अनुभवमंडप सारख्या प्रथम लोकशाहीच्या ठिकाणी 770 शरण - शरणी ( स्त्री-पुरुष ) हे त्यांच्या कार्यामुळे अति उच्च स्थान प्राप्त केले होते. या सर्वांनी आपल्या आचार विचारात साम्यता आणून शास्त्रार्थ करत होते. या ठिकाणी येणाऱ्यांची संख्या ही दिवसागणिक वाढत होती. प्रत्येकाच्या सेवाभावात कसलीच कमतरता भासू नये साठीच सर्वजण वैयक्तिक लक्ष देत होते. याठिकाणी दिवसभराच्या कायकात ( कर्म ) आलेल्या अनुभवाची चर्चा केली जात होती. या विचारमंथनातून लोणी , तूप काढल्याप्रमाणे प्रत्येकाच्या अंतर्मनात दडलेल्या वैचारिक शक्तीला विचाराचे पीठ निर्माण करून वैचारिक अधिष्ठान मिळवून देण्याचे कार्य थोर विचारवंत बसवणा यांनी केले. हे प्रथम वैश्विक विचारवंत आहेत ज्यांनी लोकशाहीच्या मार्गाने सर्वांना स्वातंत्र्य , समता , बंधुता, न्याय देण्याचे कार्य केलेले आहेत. स्त्री - पुरुषाच्या जीवनातील येणाऱ्या सुख दुःखाला धैर्याने सामोरे जाण्याचे धाडस त्यांनी दिले. जेव्हा माणसाच्या वैचारिकतेला शुद्ध आचाराची कृती जोडलेली असते तेव्हा त्या व्यक्तीच्या निर्मळ , पवित्र कार्यामध्ये चुका , भीती रहात नाहीत. शरणांनी दिवसभराच्या कार्यातून स्वतःबरोबरच सामाजिक दायित्वाची जाणीव मनामध्ये ठेवून कार्य करीत होते. या शरणाकडून एक दुसऱ्यावर कुरघोडी करण्याचे कारण कसल्याही प्रकारचे नव्हते कारण की ते बसव विचारांनी प्रेरित झालेले होते. हा चाऱ्हात सदाचार समजून वावरत होते जे बसवेश्वरांच्या या वचनात दिसून येते -

        " आचारची गुरू , आचारची लिंग

         आचारची जंगम , आचारची प्रसाद

        आचारहीन गुरु , गुरु नोहे नर

        आचारहीन लिंग , पाषाणासम पहा

        आचारहीन जंगम , जंगम नसून अन्नभोगी पहा

        आचारहीन प्रसाद , उच्छिष्टच जाणा

         आचारहीन भक्त , भक्त नव्हे भवि

        आचारहीन शरण , वेडाच पहा

सदाचार हाच सर्वसकलांचा मूलाधार कुडलसंगमदेवा. "

शरणांच्या जीवनामध्ये पसरलेल्या अंधकारला दूर करून प्रकाशाची ज्योत निर्माण करण्यासाठी सद्भक्तांना ' इष्टलिंग ' धारण करण्याची शिकवण देतात.' ईष्टलिंग ' हे शरणांच्या शरीरापासून क्षणभरसुद्धा दूर ठेवण्यात येत नव्हते. स्थावर लिंगाच्या उपासनेपेक्षा ईष्टलिंगाची उपासनाही योगसाधना व ध्यानधारणेतील परमोच्च अवस्था आहे. यामधून वाईट विचारांचा ओघ कमी होतो आणि चांगल्या विचारांचा प्रभाव अधिक वाढीस लागतो. ज्यामधून अंतःकरणाच्या कप्प्यात पावित्र्याची भावना जागृत होऊन क्षणिक सुखाच्या मागे लागून वेळ वाया घालण्याऐवजी दीर्घ काळाचा आनंद शोधण्यात धन्यता समजली जात होती. बसवेश्वरांच्या वचनाचा प्रभाव शरणांवर अत्याधिक होता. शरण यांनी आपल्या कृतीपूर्वी गुरु , लिंग , जंगमाला स्मरण करून प्रसाद भावनेने स्वीकार करण्याची शक्ती त्यांच्याकडे होती.

       मानवाच्या जीवन प्रवासात कोणतीही भक्ती करीत असताना भक्ताचे अंतकरण शुद्ध असायला पाहिजे. अंतरंगामध्ये अशुद्धी चे काहूर माजलेले असतानाच बहिरंग शुद्धी कडे लक्ष दिल्यास पूर्ण शुद्धी होणार नाही. त्यासाठी अंतरंग आणि बहिरंग दोन्ही अंग शुद्ध असल्यास मानवाच्या स्वच्छतेचा मूलमंत्र साध्य होतो. बसवेश्वरांनी शुद्धीसाठी " सप्तांग सिद्धांत " सांगितलेला आहे . जे आपण दररोजचे जीवन जगत असताना सहज करता येण्यासारख्या गोष्टी या वचनामधून मांडण्यात आलेले आहेत - 

 " चोरी करू नका , हत्या करू नका , खोटे बोलू नका

   कोणावर रागावू नका , कोणाचा अनादर करू नका

   आत्मप्रशंसा करू नका , दुसऱ्यांची निंदा करू नका

   हीच अंतरंग शुद्धी आहे , हीच बहिरंग शुद्धी आहे

   हीच कुडलसंगमदेवास प्रसन्न करून घेण्याची रीत आहे."

एकंदरीत बसवेश्वरांचे विचार आणि आचार हे खूप उंच हिमालयासारखे विशाल आहेत . त्यांच्या बसव सिद्धांतांचे अनुयायी होण्यासाठी अनेकजण सहकुटुंब कल्याणमध्ये येऊन निवासात राहिलेले उदाहरण पाहायला मिळते. अल्लमप्रभु , अक्कामहादेवी , सिद्धरामय्या , सुळे संगवा , आयदक्की लक्कंमा , मोळगी मारय्या , उरलिंग पेद्दी ,ढोर कक्कय्या , मातंग चन्नया , किन्नर बोम्मया , चिक्कया इ. अनेक शरण - शरणी आपल्या वचन साहित्यातून कन्नड लोकभाषेत मार्मिक तत्वज्ञान मांडण्याचे सामर्थ्य या संस्कृतीत. या संस्कृतीचे वारसदार सर्व वाचक वर्ग आहेत. ज्यांना येणाऱ्या संकट काळावर सहज मात करण्यासाठी बसवेश्वरांनी षटस्थल ,अष्टावरण , कायक दासोह , दयाभाव , त्याग , समर्पण , स्वर्ग-नरक परिकल्पना , वैश्विक धर्माचरण , आत्मनिवेदन , स्त्री पुरुष समानता , आंतरजातीय विवाह , चित्तशुद्धी , मानवतावाद , सहिष्णुता , पाप-पुण्य इ. अत्यंत दैनंदिन व्यवहारांमध्ये येणाऱ्या प्रसंगाचे महत्व ओळखून शांतीचे संदेश देणारे आणि इतरांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारे थोर किमयागार बसवेश्वर हे होते. त्यांचे विचार आत्मसात करून एक एक वचनाचा अर्थ लावण्यामध्ये आयुष्य कमी पडू शकते. बसवेश्वरांचे विचार आत्मसात करण्यासाठी आचार आणि विचारामध्ये साम्यता असणे आवश्यक आहे.


 प्रा.डाँ. एकलारे चंद्रकांत नरसप्पा, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय , मुखेड , ता.मुखेड जि.नांदेड, 9665582036

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी