उद्योग आणि सामाजिक कार्यासाठी झाला मोठा सन्मान
नांदेड| खूप कमी वयामध्ये उद्योग आणि सामाजिक कार्यामध्ये भरीव योगदान देणारे नांदेडचे भूमीपुत्र तथा मुंबईस्थित उद्योजक चेतन बंडेवार यांना यंदाचा ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) चा ‘युथ इन्स्पिरेटर्स अवार्ड २०२२’ हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. नागपूर येथे पार पडलेल्या कार्यक्रमांमध्ये राज्यात अनेक मान्यवरांनी आपला सहभाग नोंदवला.
यिन अर्थात ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ चा नागपुरात ‘चला घडू देशासाठी’ या समर युथ समेटचे आयोजन करण्यातआले होते. याच ‘समर युथ समेट’मध्ये पुरस्कार वितरण सोहळाही पार पडला. मुळचे नांदेड येथील असलेले उद्योगपती, चेतन बंडेवार आता मुंबईमध्ये स्थायिक आहेत. गेल्या तेरा वर्षांच्या कालावधीमध्ये चेतन बंडेवार यांनी उद्योग क्षेत्रात मोठी भरारी घेतली. चेतन यांनी उभ्या केलेल्या अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून गोरगरिबांचे आशीर्वाद घेण्यासाठी महत्वपूर्ण उपक्रम राबवले. चेतन यांच्या उद्योग आणि सामाजिक कार्याची दखल घेत, यिनच्या वतीने चेतन यांना यंदाचा ‘युथ इन्स्पिरेटर्स अवार्ड 2022’ देऊन सन्मानित करण्यात आले.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा खा. पद्मश्री डॉ. विकास महात्मे, राष्ट्रवादीची बुलंद तोफ तथा आमदार अमोल मिटकरी, पोलिस उपायुक्त गजानन राजमाने, लेखक तथा 'सकाळ'चे संपादक संदीप काळे संपादक संदीप भारंबे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला. स्मृतिचिन्ह मानपत्र असे या पुरस्कार सोहळ्याचे स्वरूप होते.
चेतन बंडेवार यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे महाराष्ट्रात सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना आनंद झाला आहे. उद्योगामध्ये नव्याने भरारी घेऊ इच्छिणाऱ्या त्या प्रत्येक युवकांसाठी चेतन बंडेवार हे एक आदर्श मानले जातील. सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी नव्याने केलेले प्रयोग, त्यातून झालेले सामाजिक काम यासाठी त्यांचा आदर्श घेऊन अनेक युवक समाजामध्ये उत्साहाने काम करतील, असे मत पुरस्कार सोहळ्याच्या दरम्यान उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना चेतन बंडेवार म्हणाले, हा पुरस्कार म्हणजे माझ्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान आहे. या पुरस्कारामुळे मला काम करण्याची ऊर्जा नव्याने प्राप्त झाली आहे. मला आशा आहे, यापुढेही याच स्वरूपाचे, वेगळे चांगले आणि समाजासाठी योगदान असणारे काम माझ्या हातून निश्चित घडेल.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातल्या कानाकोपरामधून तरुण मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. त्या सर्वांनी चेतन बंडेवार यांचे अभिनंदन करत त्यांचे स्वागतही केले. नागपुरात ‘चला घडू देशासाठी’ या समर युथ समेटचे आयोजन करण्यात आले होते. याच ‘समर युथ समेट’मध्ये पुरस्कार वितरण सोहळाही पार पडला.