नांदेड| गेल्या १४ महिन्यापासून धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर हे कायापालट सारखा एक अनोखा उपक्रम राबवित असून मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी रस्त्यावर फिरणाऱ्या भ्रमिष्ट, बेघर, भिकारी, कचरा वेचणा-या वेगवेगळ्या ३६ इसमांना नांदेड शहरातून फिरून स्वतःच्या गाडीवर आणून त्यांची कटिंग दाढी केल्यानंतर स्वच्छ पाण्याने स्नान घालून नवीन कपडे व प्रत्येकी शंभर रुपयांची बक्षिसी देण्यात आली.
खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले व लायंस प्रांतपाल दिलीप मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा महानगर नांदेड, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल व अमरनाथ यात्री संघ नांदेड यांच्या वतीने कायापालट हा उपक्रम अखंडितपणे सुरू आहे. कोरोना लाॅकडाऊन च्या काळात गरजूंना डबे वाटत असताना दिलीप ठाकूर यांच्या निदर्शनास आले की, समाजात अनेक नागरिक असे आहेत की, त्यांनी कित्येक महिन्यात अंघोळ केलेली नाही. नवीन कपडे घालण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे अशा दुर्लक्षित नागरिकांसाठी कायापालट हा उपक्रम सुरू करण्यात आला. आत्तापर्यंत साडेचारशे पेक्षा जास्त भ्रमिष्टांचा कायापालट करण्यात आला आहे. मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी या उपक्रमाची सकाळी सहा वाजता सुरुवात झाली.
लायन्स क्लब नांदेड सेंट्रल चे सचिव अरुणकुमार काबरा, लायन्स सहसचिव सुरेश शर्मा, पत्रकार संजयकुमार गायकवाड यांनी नांदेड शहरात रस्त्यावर फिरणाऱ्या भ्रमिष्ट, बेघर, भिकारी, कचरा वेचणा-या व्यक्तींना आपल्या दुचाकी वर बसवून आणले.स्वयंसेवक बजरंग वाघमारे यांनी हातमोजे घालून सर्वांची कटिंग, दाढी केली. विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी रमजान ईद असल्यामुळे वाघमारे यांच्या दुकानात गिऱ्हाइकांची गर्दी असताना देखील त्यांनी कायापालट या उपक्रमासाठी वेळ देऊन महत्त्वाचा वाटा उचलला आहे.
बालाजी मंदिराचे महंत कैलास महाराज वैष्णव यांच्यातर्फे नेहमीप्रमाणे स्नानाची उत्तम व्यवस्था करण्यात आली. सर्वांना नवीन पॅन्ट ,शर्ट ,अंडरपॅन्ट ,बनियन देणे, चहा फराळ देणे आणि हे सर्व करण्यासाठी त्यांनी तयारी दर्शवावी यासाठी शंभर रुपयाची बक्षीसी देणे इत्यादी उपक्रम कायापालटच्या माध्यमातून दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर व त्यांची टीम निरपेक्ष भावनेने या सर्व गोष्टी स्वतः करून घेतात.
गेल्या कित्येक महिन्यांपासून अंघोळ न केल्यामुळे त्यांचा पूर्वीचा अवतार आणि आता झालेला बदल यामध्ये जमीन अस्मानाचा फरक स्पष्ट जाणवत होता. हे पाहून उपेक्षितांना गहिवरून येत होते.हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी सविता काबरा, सुमनशंकर चौधरी, विलास नहारे यांनी परिश्रम घेतले. पुढील महिन्याच्या पहिल्या सोमवारी हा उपक्रम होणार असल्यामुळे अशा प्रकारच्या व्यक्ती आढळल्यास कृपया जुन महिन्याच्या पहिल्या रविवारी त्याची माहिती भाजप अथवा लायन्सच्या सदस्यांना द्यावी असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.