पती-पत्नींनी विवाह नोंदणी

प्रत्येक पती-पत्नींनी विवाह नोंदणी करुन भविष्यातील गैरसोय टाळावी
महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांचे आवाहन

नांदेड(अनिल मादसवार)महापालिका क्षेत्रातील ज्या पती-पत्नींनी आपल्या विवाहाची अद्याप नोंदणी केली नाही, अशांनी विवाहाची कागदपत्रे आणि स्वत:ची ओळख पटविणारे पुरावे सादर करुन तात्काळ विवाह नोंदणी करुन घ्यावी आणि भविष्यात होणारी गैरसोय टाळावी, असे आवाहन महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी केले आहे.
महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनियम 1998 अन्वये विवाह झाल्यानंतर त्याचे योग्य पुरावे सादर केल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेला विहित शुल्काची आकारणी करुन विवाहाची नोंदणी करुन वर आणि वधूंच्या छायाचित्रासह विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्याची तरतूद आहे. धार्मिक संस्कार किंवा अन्य पध्दतीने होणा-या वैध विवाहास कायदेशीर मान्यता असली तरी वर आणि वधू यांच्या विवाहास कायदेशीरदृष्ट्या प्रमाणित करण्यासाठी अनेकदा वेगवेगळी कागदपत्रे संकलित करावी लागतात.
विवाह नोंदणी कशासाठी?
विदेश भ्रमणासाठी जोडीदारासोबत जायचे असेल तर विवाहाचे प्रमाणपत्र बंधनकारक असते. महिलेचे विवाहानंतरचे नाव बदलल्याचा पुरावा देण्यासाठीही विवाहाची निमंत्रण पत्रिका व इतर कागदपत्रांची ऐनवेळी शोधाशोध करावी लागते. विम्याचे किंवा इतर दावे करताना विवाह नोंदणी प्रमाणपत्राची प्रत सादर करणे अपेक्षित असते. भविष्यात काही अन्य सुविधा किंवा सवलतींचा लाभ घेतानाही पती-पत्नी यांच्या एकमेकांच्या नातेसंबधाचा पुरावा आवश्यक राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरिता ऐनवेळी धावपळ करुन कागदपत्रे जमा करण्याची गैरसोय टाळण्यासाठी प्रत्येक जोडीदाराने आपल्या विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र आधी काढून ठेवणे कधीही संयुक्तीक असते.
विवाह नोंदणीचे फ़ायदे
विवाह नोंदणी प्रमाणपत्राच्या आधारे देशाबाहेर पती-पत्नी यांना एकत्र जायचे असल्यास पुरावा, विवाहानंतर महिलेच्या नावात बदल, पती-पत्नी सवलतींचा शासकीय व इतर लाभ, रेशन कार्ड किंवा अन्य शासकीय कागदपत्रांमध्ये नाव समाविष्ट करणे तसेच पती-पत्नी यांच्या विवाहाचे अन्य कायदेशीर पुरावे म्हणून विवाह नोंदणी प्रमाणपत्र अतिशय उपयुक्त ठरते.

कोण करु शकतो विवाह नोंदणी?
महापालिकेकडून विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी वर किंवा वधू यांच्यापैकी कोणीही एक जण नांदेड मनपा क्षेत्रातील रहिवासी असणे बंधनकारक आहे. विवाहाच्या वेळी वधूचे वय 18 तर वराचे वय 21 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.अर्जासोबत त्यांची कागदपत्रे असावीत. त्याशिवाय नोंदणी करता येणार नाही.
विवाह नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे
विहित नमुन्यातील अर्ज, विवाहाची निमंत्रण पत्रिका, लग्नाची विधी करणा-याचे शपथपत्र, पती-पत्नी यांचे एकत्रित छायाचित्र, दोघांचे जन्म दाखले किंवा जन्म तारखेची नोंद असलेली शैक्षणिक कागदपत्रे, दोघांचा पत्ता दर्शविणारे रहिवास पुरावे, प्रत्येकी एक पासपोर्ट फ़ोटो, निवडणूक ओळ्खपत्र किंवा सक्षम अधिका-याने दिलेला अन्य फ़ोटो ओळख पुरावा, महापालिका क्षेत्रातील तीन साक्षीदार आणि त्यांचे रहिवास व फ़ोटो पुरावे तसेच प्रत्येकी एक पासपोर्ट फ़ोटो, कोर्ट फ़ी स्टॅम्प अशी कागदपत्रे सादर केल्यानंतर त्याची छाननी करुन योग्य अर्जदारांना विहित केलेले शुल्क आकारुन तात्काळ पती-पत्नी यांचे छायाचित्र असलेले विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिले जाते.
अर्ज कोणाला आणि कुठे करता येईल?
पती किंवा पत्नी यांच्यापैकी कोणीही एक जण आवश्यक कागदपत्रांसह महापालिकेच्या संबधित क्षेत्रिय कार्यालयात अर्ज करुन शकतो. अर्जदार महापालिकेच्या ज्या क्षेत्रिय कार्यालयाच्या परिसरात राहतात, त्यांनी त्याच भागातील क्षेत्रिय अधिकारी यांच्याकडे त्यांच्या विहित नमुन्यातील अर्ज सादर करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनियम 1998 अन्वये मनपा आयुक्त हे विवाह नोंदणी निबंधक (रजिस्ट्रार)  आहेत. परंतु सन 2008-09 पासून आयुक्तांनी विवाह नोंदणी निबंधकपदाचे अधिकार महापालिकेच्या सर्व क्षेत्रिय अधिकारी तथा सहायक आयुक्त यांना प्रदान केले आहेत. त्यामुळे क्षेत्रिय अधिका-यांच्या स्तरावरच अर्ज स्विकारणे आणि प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया केली जाते.
वजिराबाद झोनमध्ये 381 विवाह नोंदणी
महापालिकेच्या वजिराबाद क्षेत्रिय कार्यालय क्र. 4 अंतर्गत 2008-09 ते आतापर्यंत एकूण 381 दांम्पत्यांची विवाह नोंदणी झाली आहे. मागील वर्षी महिला गुंजन ग्रुप आणि कै. किशोरीलाल शर्मा मिशनच्या वतीने सोमेश कॉलनीतील स्वामी समर्थ मंदिरात शिबिर घेऊन एकाच दिवशी 52 जोडप्यांची विवाह नोंदणी करुन त्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले होते. दि. 1 मार्च 2014 ते दि. 19 एप्रिल 2014 पर्यंत तीन दाम्पत्यांनी विवाह नोंदणी केली आहे. नगरसेविका पुष्पाबाई शर्मा यांची कन्या श्रुती व आदित्य भट्ट यांनी आपल्या विवाहाची नोंदणी दि.19 रोजी वजिराबाद क्षेत्रिय कार्यालयात जाऊन केली. सहाय्यक आयुक्त एस. टी. मोरे यांनी नवदाम्पंत्यांना विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र प्रदान केले. जास्तीत जास्त दाम्पत्यांनी आपली विवाह नोंदणी करुन भविष्यातील गैरसोय टाळावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी