आयर्न व फोलीक अँसिड औषध व गोळयाने भावी पिढी सशक्‍त व सदृढ बनेल

नांदेड जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांचे प्रतिपादन  


नांदेड(अनिल मादसवार) आयर्न व फोलीक अँसिड औषध व गोळया नियमितपणे मुलांना दिल्‍यास कुपोषणमुक्‍तीसह मुलांची शारीरिक वाढीसह बौध्‍दीकदृष्‍टया ते विकसित होऊन भावी पिढी सशक्‍त व सदृढ बनेल असे प्रतिपादन जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी केले.


सशक्‍त विद्यार्थी अभियानांतर्गत सोमवार दिनांक 25 नोव्‍हेंबर 2019 रोजी हिमायतनगर येथे जिल्‍हास्‍तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते, त्‍यावेळी ते बोलत होते. जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा शांताबाई पवार जवळगावकर यांच्या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या कार्यक्रमात आरोग्‍य व शिक्षण सभापती माधवराव मिसाळे, पंचायत समिती सभापती मायाताई राठोड, सरपंच सुनिता धुरमुरे, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, उप शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, गट विकास अधिकारी सुहास कोरेगावे, उपसरपंच रंजना पवार, तालुका आरोग्‍य अधिकारी डॉ.संदेश पोहरे, बाल विकास प्रकल्‍प अधिकारी सुधिश मांजरमकर, गट शिक्षणाधिकारी रमेश संगपवाड आदींची उपस्थिती होती.



पुढे ते म्‍हणाले, बालकांमधील रक्‍तक्षय टाळण्‍यासाठी योग्‍य व सकस आहार घेणे महत्‍वाचे आहे. सशक्‍त शरीर – बुध्‍दीमान मन याची जाणीव विद्यार्थी व पालकांना होणे आवश्‍यक आहे. तसेच बालकांचे पोषण होण्‍यासाठी लोह आणि कॅल्शियम महत्‍वाचे आहे. म्हणूनच आपण दूर्गा बाल महोत्‍सव ही योजना प्रत्‍येक अंगणवाडीमध्‍ये राबविली आहे. यात सर्व गरोदर महिला स्‍वत:चा डबा घेऊन एकमेकींना आहाराची देवाण घेवाण करुन एकत्रितपणे जेवण करुन गप्‍पा मारतात यामुळे सर्व प्रकारच्‍या व्हिटॅमीनची अन्‍न मिळून हिमोग्‍लोबिन वाढण्‍यास मदत झाल्‍याचे दिसून आल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगितले. प्रारंभी क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले व धन्‍वंतरी देवीची पूजा करुन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते व्दिप प्रज्‍वलन करुन जिल्‍हास्‍तरीय कार्यक्रमाचा शुभारंभ करण्‍यात आला. याप्रसंगी उपस्थित मान्‍यवरांचे ग्राम पंचायतीच्‍या वतीने शॉल, पुष्‍पहार देऊन सत्‍कार करण्‍यात आला. तसेच उपस्थित बालकांना आयर्न व फोलीक अँसिड औषध व गोळया देण्‍यात आल्‍या. यावेळी स्‍वच्‍छ हात धुण्‍याचे प्रात्‍यक्षिक करुन दाखविण्‍यात आले. गाव शंभर टक्‍के हागणदारीमुक्‍त करण्‍यासंदर्भात ग्राम विकासाचे प्रधान सचिव असीम गुप्‍ता व पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता विभागाचे संजय चहांदे यांनी सरपंचांना पत्र दिले आहे. या पत्राची प्रत जवळगाव येथील सरपंच सुमनबाई धुरमुरे यांना देण्‍यात आली.



आरोग्‍य व शिक्षण सभापती माधवराव मिसाळे म्हणाले, ग्रामीण भागातील लोकांची आरोग्‍यमान उंचावण्‍यासाठी केंद्र व राज्‍य शासनाच्‍या वतीने विशेष काळजी घेतली जाते. सशक्‍त विद्यार्थी अभियानांतर्गत जिल्‍हाभरात सुरु असलेल्‍या कार्यक्रमात गरोदर माता, शालेय विद्यार्थी, अंगणवाडीतील बालक यांना सशक्‍त करण्‍याची मोहिम जिल्‍हा परिषदेने हाती घेतली आहे. या मोहिमेची प्रत्‍यक्ष अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, असे ते म्‍हणाले. जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला जिल्‍हा माहिती कार्यालयाचे विवेक डावरे, मिलिंद व्‍यवहारे, विशाल कदम, सुभाष खाकरे, विस्‍तार अधिकारी डी.आय. गायकवाड, राजिव क्षीरसागर, ग्राम विकास अधिकारी शैलेश वडजकर, श्रीरंग पवार, उत्‍तमराव पवार, गंगाधरराव पांचाळ, नारायण बसरकर, पांडूरंग पवार, शंकरराव धरमुरे, रावसाहेब पवार, सुभाष माने, संजय माने, संतोष हातागळे, अंगणवाडी कर्मचारी, पत्रकार, शिक्षक, गरोदर माता, शालेय विद्यार्थी आदींची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.

आयर्न गोळयामुळे शालेय विद्यार्थी सशक्‍त होतील – जि.प.अध्‍यक्षा शांताबाई जवळगावकर


शालेय विद्यार्थ्‍यांना आयर्नच्‍या नियमित गोळया दिल्‍यास रक्‍तक्षयाचे प्रमाण कमी होऊन शालेय विद्यार्थी यशक्‍त होतील असे मत जि.प.अध्‍यक्षा शांताबाई जवळगावकर यांनी व्‍यक्‍त केले. आज या विशेष अभियानांतर्गत जिल्‍हयातील सुमारे 2530 जिल्‍हा परिषद शाळा व 3600 अंगणवाडीमधून विशेष मोहिम राबविण्‍यात आली. या मोहिमेमध्‍ये पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व पालक यांच्‍या सहकार्यातून ही मोहिम यशस्‍वी झाली आहे. शाळा व अंगणवाडीमधून दर सोमवारी आयर्न व फोलीक अँसिड औषध व गोळया नियमितपणे विद्यार्थ्‍यांना देण्‍याचे आवाहन त्‍यांनी यावेळी केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी