हुजपा शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिखल-पाणी; अबाल वृद्धांची कसरत
हिमायतनगर, अनिल मादसवार। काल सकाळी झालेल्या मान्सूनपूर्व दमदार पावसामुळे शहरातील बहुतांश गल्ली बोळातील रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे रस्त्याने ये - जा करताना शालेय विद्यार्थी, अबाल वृद्धांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कारण नगरपंचायत अंतर्गत शहरात सुरु असलेल्या १९ कोटीच्या पाणी पुरवठा नळयोजनेच्या काम करणाऱ्या ठेकेदाराने शहरातील संपूर्ण रस्ते पाईपलाईनच्या नावाखाली खोदून ठेवले. मात्र त्याची दुरुस्ती न करताच जैसेथेच ठेवल्यामुळे रस्त्यावर चिखल आणि पाणी साचून रहद्दतील अडथळा निर्माण होतो आहे. या प्रकारामुळे शहरातील नागरिकातून नगरपंचायतीच्या नियोजनशून्य कारभाराबाबत संताप व्यक्त केल्या जात आहे.
मृग नक्षत्राला प्रारंभ होण्यासाठी आणखी १५ दिवसाचा अवधी शील्लक असताना आभाळात ढगांनी गर्दी करून मान्सूनपूर्व पावसाच्या सरी दि. १९ रोजी हिमायतनगर शहरासह परिसरात कोसळल्या आहेत. या पावसामुळे हिमायतनगर शहरातील अनेक गल्ली बोळातील रस्त्यावर पाणी साचले असून, या पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग नसल्याने पाणी मुरून रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शहरातील वॉर्ड क्रमांक ११ मध्ये माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांताताई पाटील यांनी ग्रामीण भागातील मुलींसाठी सुरु केलेल्या हुतात्मा जयवंतराव पाटील कन्या शाळा व महाविद्यालय आहे. तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नगरपंचायतीने नाल्याचे बांधकाम केले नसल्याने येथे पाणी साचून डबके तयार झाले आहे. या डबक्यातून वाहनांची ये- जा होत असल्याने परिसर चिखलमय झाला असून, हा प्रकार पाणी पुरवठा योजनेच्या ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे निर्माण झाला असल्याचे नागरिक सांगत आहेत.
खरे पाहता नळ योजनेचे काम करण्यापूर्वी ठेकेदाराने पैनगंगा नदीवर पाण्याच्या टाकीचे निर्माण केल्यानंतर शहरातील नळयोजनेचे काम सुरु करायला पाहिजे होते. मात्र शासनाकडून मंजूर झालेला निधी लाटण्याच्या उद्देशाने पाण्याच्या टाकीचे बांधकाम न करता ठेकेदाराने मापाच्या अधिकारी, अभियंत्यांना हाताशी धरून नुकतेच शहरात कोट्यवधींच्या खर्चातून करण्यात आलेली सिमेंटचे रस्ते नळ योजनेची पाईपलाईन करण्याच्या नावाखाली फोडली आहेत. त्यामुळे शासनाकडून शहरातील रस्त्यासाठी मिळालेल्या कोट्यवधींचा निधी वाया गेला आहे. कारण करण्यात आलेली बहुतांश रस्ते व नाल्याची कामे बोगस पद्धतीने झाली असून, अल्पावधीतच रस्ते मातीत मिसळले आहेत. हा विकासकांचा बोगसपणा शासन व जनतेच्या लक्षात येऊ नये म्हणून १९ कोटीच्या नळयोजनेच्या कामाच्या नावाखाली अगोदर रस्ते फोडून पाईपलाईन करण्याचा घाट रचल्या गेला आहे. परिणामी त्यामुळे शहरात विकास कामाच्या योजना केवळ ठेकेदार, अधिकारी व पदाधिकारी यांच्या फायद्यासाठी राबविल्या जात आहेत कि काय ..? अशी शंका विकासप्रेमी नागरीकातून व्यक्त केली जात आहे .
काल झालेल्या पावसामुळे जिकडे तिकडे चिखल झाला असून, पाणी साचून राहिल्याने आणि घाणीमुळे डासांची उत्पत्ती वाढली आहे. या प्रकारामुळे नगरपंचायत प्रशासनाकडून सांगितल्या जाणारे आपले शहर सुंदर शहर हि संकल्पना मोडीत निघाल्याचे यावरून दिसते आहे. शहरातील वॉर्ड क्रमांक ११ मधील रस्त्यावरील चिखल आणि घाण पाणी यामुळे रस्त्याची वाताहत झाली आहे. या रस्त्याने ये-जा करताना विद्यार्थ्यांना आणि अबाल वृद्धांना मोठ्या जिकीरीचा सामना करावा लागतो आहे. या समस्येपासून दिलासा देण्यासाठी नगर पंचायत प्रशासनाने तातडीने रस्त्यावर चुरी टाकून पुढील काळात या भागात नाल्याचे बांधकाम करून घाण पाण्याची विल्हेवाट लावावी आणि शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांना रास्ता बनून द्यावा अशी रास्ता मागणी, शिक्षक, विद्यार्थी आणि अबाल वृद्धाकडून केली जात आहे.