एकंबा - एकघरी प्रधानमंत्री ग्रामसडक रस्ताकामात अभियंत्याच्या संगनमताने गुत्तेदाराचा बोगसपणा -NNL

जुना डांबरी रस्त्यावर रस्ता निर्माण करून शासनाकडून निधी लाटण्याचा प्रयत्न सुरु    

निकृष्ट दगड, माती मिश्रीत मुरूम; राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष  


हिमायतनगर, अनिल मादसवार| मागील अनेक वर्षांपासून एकंबा - सिरपल्ली- डोल्हारी- पळसपूर- हिमायतनगर- पार्डी - एकघरी या प्रधानमंत्री ग्रामसडक रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे एखाद्याचा बळी गेल्याशिवार रस्त्याचे काम सुरु होणार नाही का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला होता. त्यानंतर खा.हेमंत पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामाला सहा महिन्यापूर्वी सुरुवात झाली. यावेळी खासदार महोदयांनी ठेकेदारास दर्जेदार रस्ता  लवकरात लवकर करून देण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र ठेकेदाराने त्यांच्या सूचनेला केराची टोपली दाखवून अभियंत्याशी मिलीभगत करत या रस्त्याच्या कामात बोगसपणा आणला आहे. त्यामुळे अल्पवधीतच हा रस्ता धुळीत मिसळून शासनाकडून उपलब्ध झालेल्या ७३०.२४ लक्ष रुपये पाण्यात जाण्याची शक्यता निकृष्ट पद्धतीने केल्या जात असलेल्या रस्त्याच्या कामावरून उघड होत असल्याचा आरोप शेतकरी, नागरीकातून केला जात आहे.  


हिमायतनगर तालुक्यात आणि हिंगोली लोकसभा मतदार संघात येणाऱ्या एकंबा - एकघरी प्रधानमंत्री ग्रामसडक रस्त्याच्या कामाला गतवर्षी मंजुरी मिळाली होती. या रस्त्याच्या कामासाठी ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन द्वारा अर्थसहाय्य प्रकल्पांतर्गत कार्यकारी अभियंता नांदेड यांच्या देखरेखीखाली होणाऱ्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या ११ किमी ९९० मीटर यात ५ ठिकाणी पुलमोर्यासह निर्मितीसाठी ७३०.२४ लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला. या रस्त्याच्या निर्मितीचे काम में एम ए सिद्दीकी, औरंगाबाद याना देण्यात आले आहे. या रत्स्याच्या कामाची सुरुवात ७ जानेवारी २०२२ रोजी हिंगोलीचे खासदार हेमंतभाऊ पाटील व हदगाव-हिमायतनगर तालुक्याचे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते भूमिपूजन करून झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी वेळेत रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून या भागातील प्रवाशी नागरिक व वाहनधारकांची होणारी हेळसांड थांबवावी असे सूचित केले होते.



मात्र ठेकेदारने रस्त्याचे मजबुतीकरण कामात हयगय केली आहे, खरे पाहता अंदाजपत्रकाप्रमाणे जुना डांबरी रस्ता खोदून काढून त्यावर मातीकाम भराव टाकणे त्यावर खादीचा एक थर म्हणजे १५० मिमी जाड जीएसबी चा खडी थर टाकून मजबुतीकरण करणे गरजेचे होते. मात्र यात ठेकेदाराने अभियंत्याशी मिलीभगत करून मनमानी पद्धतीने काम करत आहे. जुना डांबरी रस्ता न खोदताच त्यावर मुरूम व अल्प प्रमाणात गिट्टी टाकून थातुर माथूर पद्धतीने रस्त्याचे काम उरकण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. प्रधानमंत्री सडक रस्त्याचे काम करणारा गुत्तेदार में एम.ए.सिद्दीकी यांचेकडून रस्त्याचे खोदकाम न करताच केवळ डांबरी रस्त्यावर जेसीबीने रेघाट ओढून वरचा भाग थातूर- मातूर पद्धतीने उकरून रस्त्याचे काम बोगसपणे करून शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न चालविला आहे.



सदरील रत्स्याचे काम सुरु झाल्यानंतर सुरु असलेल्या कामाच्या साईटवर कार्यकारी अभियंता सुधीर पाटिल यांनी भेट देऊन कामाचा दर्जा वाढविणे गरजेचे होते. मात्र या कामावर त्यांनी अद्याप पर्यंत भेट देऊन कामाची गुणवत्ता तपासली नसल्याने एकंबा - सिरपल्ली- डोल्हारी- पळसपूर- हिमायतनगर- पार्डी - एकघरी रस्त्याची अत्यंत सोयीस्कररीत्या विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप या रस्त्याने ये - जा करणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांसह शेतकरी वर्गातून केला जात आहे. तसेच रस्ता कामात माती मिश्रित मुरूम, निकृष्ट दर्जाचा दगड वापरत असल्याचे नागरिक सांगत आहेत. अश्या पद्धतीने रस्त्याचे काम निकृष्ट व बोगस दर्जाचे केले जात असल्याने एकही राजकीय पुढारी या रस्त्याच्या कामाकडे लक्ष न देत नसल्याने सर्वसामान्य जनतेतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  याबाबत अभियंता सुधीर पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी