खासदार इम्तियाज जलील यांचे अभिनंदन केलेच पाहिजे -NNL


औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचे मनापासून अभिनंदन केले पाहिजे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर औरंगाबाद येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी जे अचूक विश्लेषण केले त्यावरुन ते सजग लोकप्रतिनिधी असल्याचे मान्य केले पाहिजे. राज ठाकरेंवर थातूर मातूर गुन्हे दाखल केले असा जलील यांचा आरोप आहे. खासदार संजय राऊत महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे असे म्हणतात. परंतु ते खरे नाही. राज्यात कायदा माणूस पाहून राबविला जातो हे इम्तियाज जलील यांनी सप्रमाण दाखवून दिले.

राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी केलेल्या जाहीर भाषणात मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला. हा मुद्दा नवीन नाही. शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी यापूर्वी हा मुद्दा अनेकवेळा उपस्थित केला. हिंदुत्वाच्या दिशेने वळण घेताना राज ठाकरे यांनी याच मुद्याचा आधार घेत नवनिर्माणाचा प्रयत्न केला. परंतु तो उपस्थित करताना राज ठाकरे यांनी तीन तारखेचा अल्टिमेटम देत, त्यानंतर जर भोंगे उतरविले नाही तर मशिदीसमोर स्पीकरवर मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावण्याचा इशारा दिला. राज ठाकरे यांनी हा मुद्दा उपस्थित केला तेव्हा देशात मुस्लीम धर्मियांचे रोजे सुरु होते. तीन तारखेला रमझान ईद होती. त्यामुळे सहाजिकच राज्यात खळबळ उडाली. गुडीपाडव्याच्या सभेनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी कडून राज ठाकरेवर कठोर टीका झाली. काँग्रेसच्या काही नेत्यांनीही टीका केली. त्यामुळे राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले.

 परंतु त्यानंतर ठाण्याच्या उत्तर सभेत राज ठाकरे यांनी पुन्हा भोंग्याची भूमिका मांडलीच. त्यानंतर गाजावाजा झालेल्या औरंगाबादच्या सभेतही त्यांनी आक्रमकपणे मशिदीवरील भोंगे उतरविण्याची भूमिका मांडली. राज ठाकरे ही भूमिका मांडत असताना राज्यात मध्ये एक उपकथानक घडले. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी शिवसेनेला डिवचण्यासाठी मातोश्री समोर हनुमान चालिसा वाचण्याचे जाहीर केले. (ही त्यांची कृती समर्थनीय नाहीच) स्वाभाविक त्यामुळे शिवसेनेत खळबळ माजली. त्यानंतर राणा पती-पत्नी मातोश्रीसमोर हनुमान चालिसा वाचण्यासाठी मुंबईत दाखल झाले. दुसरीकडे मातोश्री समोर शिवसैनिक जमा झाले. पोलिसांनी पुढील संघर्ष टाळण्यासाठी राणा दांम्पत्यांना खार मधील निवासस्थानी रोखून धरले. राणा दांम्पत्यांनी दुपारी मातोश्री समोर हनुमान चालिसा वाचण्याचा बेत रद्द केल्याचे जाहीरही केले. त्यानंतर मात्र पोलिसांनी राणा दांम्पत्यांविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला. इतरही अनेक कलमे लावून त्यांना अटक केली. ते अजूनही तुरुंगातच आहेत.  

राजद्रोह याचा अर्थ सरकारविरोधात कट रचणे, सत्तेला आव्हान देणे वगैरे. आता मुद्दा असा आहे की, गुडी पाडव्यापासून झालेल्या तीन सभात राज ठाकरे मशिदीवरील भोंगे उतरविले नाही तर मशिदीसमोर हनुमान चालिसा लावणार असे म्हणतात. याचा अर्थ सरकारने भोंगे उतरवावे. तुम्ही उतरविले नाही तर आम्ही हनुमान चालिसा लावणार. हे सरकारला आव्हान नाही का? राज ठाकरे हे खाजगीत सांगत नाही तर लाखो लोकांच्या जाहीर सभेत सांगतात. मग हा सरकार विरोधात कट होत नाही का? दोन धर्मात संघर्षाची ठिणगी यामुळे पडत नाही का? यामुळे धार्मिक सलोखा बिघडत नाही का? जर याची उत्तरे हो असतील तर, राज ठाकरे यांच्या विरोधात गुडी पाडव्याची सभा झाल्यानंतर लगेच राज द्रोहाचा, चिथावणीखोर वक्तव्याचा, धार्मिक सलोखा बिघडविण्याचा गुन्हा दाखल का करण्यात आला नाही? अमरावतीचे राणा दांम्पत्य मातोश्री समोर (मशिदीसमोर नाही) हनुमान चालिसा वाचणार म्हटले की, राजद्रोह होतो. 

मातोश्री समोर हनुमान चालिसा वाचतो म्हटले की तो सरकार विरुद्ध कट होतो, त्याने राज्यातील धार्मिक सलोखा बिघडतो. राणा दांम्पत्यांनी राज ठाकरेंच्या सभेनंतरच हनुमान चालिसा वाचण्याची भूमिका घेतली होती. याचा अर्थ राणा दांम्पत्यांच्या आव्हानाला प्रेरणा राज ठाकरे यांचीच होती. म्हणजे ज्याने प्रेरणा दिली तो सहिसलामत आणि ज्यांनी  प्रेरणा घेतली ते तुरुंगात हा कोणता न्याय आहे?  पोलिस प्रत्येक गु्न्ह्यात मास्टर माईंड शोधत असतात. मग राणार दांम्पत्यांचे मास्टर माईंड कोण? जो गुन्हा राणा दांम्पत्याने केला तोच गुन्हा राज ठाकरे यांनीही केला. किंबहुना राणा दांम्पत्यांपेक्षा काकणभर जास्त केला. लागोपाठ तीन वेळा केला. त्यानंतरही ते राजद्रोहाच्या गुन्ह्यापासून वंचित कसे राहू शकतात. नेमका हाच मुद्दा खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला. इम्तियाज जलील यांच्या पक्षाचे विचार कोणाला मान्य असोत किंवा नसोत परंतु त्यांनी मांडलेला मुद्दा सर्वानाच मान्य करावा लागेल. मशिदीसमोर हनुमान चालिसा लावण्याने राज्यातील धार्मिक सलोखा बिघडत नाही, मातोश्री समोर हनुमान चालिसा वाचला की बिघडतो का? हा मुद्दा जलील यांनी उपस्थित केला.

खासदार संजय राऊत महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे असे छातीठोकपणे कितीदाही सांगोत. परंतु राज्यात कायदा माणसाचे तोंड पाहून राबविला जातो हा संदेश महाराष्ट्रात सर्वदूर गेला आहे. राज ठाकरेंच्या जागी अन्य कोणीही असता तर त्याच्या विरोधात गुडीपाडव्यालाच राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला असता. परंतु तसे घडले नाही. कायद्याप्रमाणे कारवाई करणे हे पोलिस यंत्रणेचे प्रथम कर्तव्य आहे. परंतु राज्यातील पोलिस यंत्रणा राजकारण्यांच्या तालावर नाचते हेही यातून दिसून आले. प्रश्न मशिदीवरील भोंग्याचा किंवा हनुमान चालिसाचा नाही. प्रश्न आहे संपूर्ण देशात अत्यंत सुसंस्कृत, प्रगतीशील, सनदशीर मार्गाने जाणारे महाराष्ट्र राज्य आज कोणत्या दिशेने प्रवास करीत आहे. भोंगे हे विद्यार्थी, वृद्ध, रुग्ण यांच्यासाठी त्रासदायक ठरत असतील तर ते उतरविले पाहिजेत. मग ते भोंगे मशिदीवर असोत किंवा मंदिरावर असोत. नांदेड जिल्ह्यातील बारड गावात गेल्या अनेक वर्षापासून कोणत्याही कार्यक्रमात मशिद, मंदिरावर भोंगे लावण्याला बंदी आहे. तेथे कधीही वाद झाला. जातीय किंवा धार्मिक संघर्ष झाला नाही. 

राज्यातही असे होऊ शकते. फक्त ते करण्याची राज्यकर्त्यांची इच्छा शक्ती पाहिजे. पण दुर्देवाने राज्यात भोंगे हे राजकारणाचे खेळणे झाले आहे. एकाला मतासाठी ते काढायचे आहेत, दुसऱ्यालाही ते मतासाठीच काढायचे आहे. भोंगे काढले तर उद्या काय बोलावे, काय करावे असा प्रश्न राज्यातील अनेक नेत्यासमोर उभा राहणार असल्याने सध्या भोंग्याभोवती राजकारण फिरत आहे. त्यात निष्कारण पोलिस यंत्रणा बदनाम होत आहे. कारण गुन्हे पोलिस ठाण्यात नोंद होत असले तरी त्याचे आदेश मुंबईतून येत आहेत. पोलिसांची प्रतिमा सांग पाटला काय लिहू, दौत टाक कोठे ठेऊ, उपड पऱ्ह्यट्या पेर गहू अशी होत आहे. भोंग्यापेक्षाही हे अति भयानक आहे. यामुळे राज्य अधोगतीला जात आहे.

....विनायक एकबोटे, ज्येष्ठ पत्रकार नांदेड.

 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी