कंधार,सचिन मोरे। कंधार शहराजवळून वाहणाऱ्या मन्याड नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन शालेय विद्यार्थ्यांचा पाण्याचा अंदाज न आल्याने नदीपात्रात बूडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि.२२ रविवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून, अंगाची लाहीलाही होत आहे. अश्यात सौरभ सतिष लोखंडे वय १६ वर्षे आणि त्याचा मित्र ओम राजू काजळेकर वय १५ वर्षे रा. गवंडीपार कंधार हे स्वप्निल पाटील लुंगारे यांचे शेताच्या दक्षिणेस 3 किलोमीटर अंतरावर कंधार शिवारात असलेल्या मन्याड नदिचे पात्राच्या पाण्यात पोहण्यासाठी गेले होते. ते पोहत असताना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने नदी पात्रात गाळ असल्याने पाण्यात बुडाले आहेत.
अशी माहिती त्यांचे सोबत असनारा मुलगा बालाजी तुकाराम डांगे रा. लुंगार गल्ली कंधार याने सतीष संभाजीराव लोखंडे वय ४० वर्षे यांना घरी येउन दिल्याने त्यांनी तात्काळ नदीपात्राच्या ठिकाणी धाव घेतली तेव्हा तेथे दुसऱ्या युवकाचे वडील राजू काजळेकर हे देखिल आले. येथे असलेले परमेश्वर बालाजी चौधरी, कृष्णा बालाजी चौधरी दोघे रा. गवंडीपार कंधार, लक्ष्मण गुंडप्पा जोतकर रा. मुक्ताईनगर कंधार यांचे मदतीने दोन्हीही मुलांचा मन्याड नदीचे पात्रात शोध घेउन दोघांचाही मृतदेह नदी पात्रातुन बाहेर काढला.
सौरभ पि. सतिष लोखंडे व ओम राजू काजळेकर मन्याड नदिचे पात्रात पोहण्यासाठी गेले होते ते पोहत असताना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला अशी माहिती एका मयत विद्यार्थ्याचे वडील सतीश लोखंडे यांनी दिली. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक आर एस पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली स.उप.पो.नि. आर यु गणाचार्य हे करीत आहेत. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कंधार ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करून शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांना ताब्यात दिल्यानंतर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.