नांदेड| लायन्स प्रांतपाल या नात्याने महाराष्ट्रातील १४ महसूली जिल्हे ज्यात मराठवाड़ा, खानदेश आणि विदर्भाचा काही भाग येतो. अशा ८५ क्लबच्या माध्यमातून वर्षभरात ५७ हजार उपक्रमा मार्फत ७० लाखापेक्षा जास्त गरजूंना लाभ मिळवून देण्यात पुढाकार घेऊन एक नवीन विक्रम करणारे दिलीप मोदी यांना वर्ष २०२१ चा नांदेड भूषण पुरस्कार १४ व १५ मे रोजी होणाऱ्या नरेंद्र - देवेंद्र महोत्सवात देण्यात येणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष डॉ. सचिन उमरेकर व संयोजक धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.
दिलीप मोदी यांनी आपले वडील स्वर्गीय रामप्रसाद मोदी यांचा वारसा पुढे चालवत नांदेड शहरात होणाऱ्या प्रत्येक सामाजिक व धार्मिक कार्यात आर्थिक योगदान सातत्याने दिले आहे.शून्यातून विश्व निर्माण करत असताना एक प्रामाणिक व्यापारी म्हणून सचोटीने काम करत आहेत. आपल्या व्यापारा मुळे समाजस्वास्थ्य बिघडणार नाही असा कोणताही व्यवसाय त्यांनी केला नाही.दरवर्षी समाजातील दोन गरीब व्यक्तींना आर्थिक सहकार्य करून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहन देतात.
नंदिग्राम आय हॉस्पिटल, रयत रुग्णालय चे सदस्य आहेत. श्याम मंदिर चे संस्थापक अध्यक्ष आहेत. याशिवाय विविध व्यापारी संघटनांचे दिलीप मोदी हे पदाधिकारी आहेत.ते मतिमंद विद्यालय अनाथ आश्रम व वृद्धाश्रमात नेहमी मदत करतात.लायन्स आय हॉस्पिटल जंगमवाडी मध्ये आरओ प्लांट, लायन्स आय हॉस्पिटल सिडको येथील प्रतिक्षालयात टाइल्स बसविले. कवठा येथील पोलीस चौकी उभारण्यात त्यांचा ही वाटा आहे.
वीस गरीब रुग्णांची स्वखर्चाने मोतीबिंदू शस्त्रक्रिये साठी हॉस्पिटल मध्ये रक्कम जमा केली. मतिमंद विद्यालयात दोन वेळा आरोग्य तपासणी शिबिर व मोफत औषधी वाटप करण्यात आले.गरीब रुग्णांना चष्मे वाटप केले. २०१५-१६ या वर्षात लायन्स क्लब नांदेड चे अध्यक्ष म्हणून त्यांनी वर्षभरात ३६५ उपक्रम राबवले. हजारो गरजुना शैक्षणिक, वैद्यकीय, सांसारिक साहित्याचे क्लब तर्फे वाटप केले. धार्मिक क्षेत्रात देखील दिलीप मोदी यांचे काम अतिशय चांगले आहे. सांगवी येथील शाम मंदिर उभारण्यासाठी सात हजार स्क्वेअर फुट जागा दान केली. श्याम मंदिर येथील पुजारी यांना स्वखर्चाने घर बांधून दिले.
अनेक पदयात्रा व भंडा-यामध्ये सातत्याने अन्नदान करीत असतात. नांदेड मध्ये झालेल्या जवळपास सर्व यज्ञांमध्ये त्यांचे सहभाग असतेच. कवठा परिसरात प्री प्रायमरी स्कूल सुरू करून त्यामध्ये लहान मुलांना शैक्षणिक सोबतच व्यवहारज्ञान शिकवले जाते दरवर्षी दोन गरीब मुलांना मोफत प्रवेश दिला जातो.शारदा भवन शाळेचे माजी विद्यार्थी या नात्याने दर वर्षी शिक्षक दिनानिमित्त दोन शिक्षकांना त्यांच्या घरी जाऊन भेट वस्तु देऊन सत्कार करुन आशीर्वाद घेतात.महाराजा अग्रसेन शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून यामार्फत दरवर्षी अग्रवाल समाजातील गरीब विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्क भरण्याची सुरुवात केली आहे.
कोरोना लॉकडाऊनच्या काळात मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले. लॉयन्स तर्फे महंगरपालिके सोबत सहा दिवस कवठा येथे लसीकरण शिबिर घेतले. यावर्षी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त अनाथ आश्रमातील मुले व वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना स्वतः व इतर लॉयन्स सदस्या सोबत कार मधून नांदेड शहरात फेरफटका मारला. तसेच त्यांना नवीन कपडे देऊन लायन्स हॅपी डे साजरा केला.आतापर्यंत लायन्स चे व इतर २०० पेक्षा जास्त पुरस्कार मोदी यांना मिळाले आहेत.
या सर्व कामाची दखल घेऊन पं. दीनदयाल उपाध्याय स्मृती प्रतिष्ठान तर्फे रोख रु. ५०००, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व महावस्त्र देऊन नांदेड भूषण पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते नरेंद्र- देवेंद्र महोत्सवात सन्मानित करण्यात येणार आहे.काही अपरिहार्य कारणामुळे चार वर्षापासून पुरस्काराचे वितरण करण्यात आले नव्हते. आता कोरोनाचे निर्बंध उठल्यामुळे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर व भाजप जिल्हाध्यक्ष प्रविण साले यांच्या मार्गदर्शनाखाली नरेंद्र- देवेंद्र महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. देशातील नामवंत कवींना व हास्य कलाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी दोन दिवस उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.