नांदेड। कधी काळी मराठवाड्याची औद्योगीक राजधानी असलेला नांदेड जिल्हा उद्योगांच्या बाबतीत उध्वस्त झाला आहे, अशी खंत मराठवाडा जनता विकास परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष माजी खा.डॉ.व्यंकटेश काब्दे यांनी व्यक्त केली.
मराठवाडा जनता विकास परिषद नांदेड शहर शाखेची बैठक शहराध्यक्ष ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली सायन्स महाविद्यालयात पार पडली. या बैठकीला मार्गदर्शन करताना डॉ.व्यंकटेश काब्दे म्हणाले की, औद्योगीकीकरणातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतात. आर्थिक विकास तर होतोच त्यासोबत विकासाला गतीही प्राप्त होते. परंतु नांदेड जिल्ह्यातील औद्योगीकीकरण सध्या उध्वस्त अवस्थेमध्ये आहे. कृष्णूरची औद्योगीक वसाहतीत चार-दोन उद्योग सोडले तर ओसाड झाली आहे. नांदेड-बिदर-देगलूर रेल्वे मार्ग झाला तर या औद्योगीक वसाहतीला चालना मिळू शकते. रेल्वे मार्गाबाबत राज्य व केंद्र शासनाचे उदासीन धोरण आहे. राज्य शासन स्वतःचा वाटा देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. नुकतेच राज्याच्या गृहमंत्र्यांनी पोलीस आयुक्तालयाची घोषणा केली.
परंतु त्याचीही अंमलबजावणी होवू शकली नाही. मंजूर झालेले विभागीय आयुक्तालय अद्याप निर्माण होवू शकले नाही. या प्रलंबित मागण्या व संपुर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या माध्यमातून अभ्यासपूर्ण प्रभावी दबाव गट निर्माण करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी बोलतांना ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर यांनी जुनी उस्मानशाही मिल अर्थात एनटीसीच्या जागेवर टेक्सटाईल पार्क निर्माण करुन छोट्या-छोट्या उद्योजकांना वस्त्रोद्योगासाठी केंद्र सरकारने सहकार्य करावे. त्याचबरोबर दाभड येथे आयुर्वेदीक विद्यापीठ निर्माण करुन नावाजलेली रसशाळा पूर्ववत चालू करावी, अशी मागणी यावेळी केली.
यावेळी केंद्रीय सहसचिव प्रा.अशोक सिद्धेवाड यांनी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या संपर्क अभियानाची माहिती देवून विकासासाठी सर्वांना संघटीत करावे, असे आवाहन केले. यावेळी शिक्षण, औद्योगीकरण, रेल्वे विकास, आरोग्य, पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर उपस्थितांनी अभ्यासपूर्ण चर्चा करुन या प्रश्नांवर दबाव गट निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त केला. याप्रसंगी रामराव थडके, ऍड.केदार जाधव, प्रा.अरविंद जोगदंड, इंजि.तानाजी हुस्सेकर, एच.एस.साखरे, प्रा.प्रभाकर जाधव, सूर्यकांत वाणी, प्रा.सौ.ललिता कुंभार, बी.एम.टिमकीकर, बाळासाहेब देशमुख आदींनी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी प्राचार्य राजेंद्र माळी, नारायण देवकते, रामचंद्र देठे, बसवेश्वर राजेवार, तिरुपती घोगरे, प्रा.डॉ.विजयसिंह ठाकूर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.