नांदेड। महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डी पी सावंत यांच्या घरात शिरत एका बंदुकधारी युवकाने त्यांच्यावर बंदूक रोखली तर घरकर्मचाऱ्याला मारहाण देखील केली असल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, काँग्रेसचे माजी राज्यमंत्री डी पी सावंत यांच्या नांदेडमधील निवासस्थानी दि 30 रोजी घुसून 50 हजाराची खंडणी मागण्यात आली. खंडणी देण्यात नकार दिल्याने गुन्हेगारांनी चक्क बंदुक रोखली या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
माजी मंत्री डी पी सावंत यांचे निवासस्थान हे महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या समोरच्या बाजूस आहे. याच निवासस्थानी साहिल माने नावाचा युवक दि 30 रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास सावंत यांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी आला होता. त्याने सावंत यांची भेट घेतली. काही कामानिमित्त त्याने सावंत यांची भेट घेतली होती. त्यानंतर पुन्हा दुपारी तो युवक परत सावंत यांच्या निवासस्थानी आला. यावेळी त्याने सावंत यांच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. पण माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून सावंत यांनी सांगितले.
या गुन्हेगाराने घरात घुसून किचनमध्ये असलेल्या नोकराला देखील मारहाण केली. बंदुकीचा धाक दाखवीत ५० हजार रुपयाची मागणी केली, त्यानंतर त्याने डी.पी.सावंत यांच्याकडेही बंदुकीचा रोख दाखवित पैशाची मागणी केली. या प्रकारामुळे भयभीत झालेल्या सावंत यांनी त्यांच्या घरासमोरील अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानाबाहेर असलेल्या सुरक्षारक्षकांना आवाज दिला. तेंव्हा त्या तरुणाने तिथून पळ काढला, या प्रकारामुळे पुन्हा एकदा नांदेडच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनी सदरील तरुणाला ताब्यात घेतलं असून, साहिल माने असं त्या तरुणाचे नाव आहे. त्या तरुणाने वापरलेली बंदूक खोटी असल्याचेही निष्पन्न झाले असून, त्याने आपण बीडचा असल्याचे सांगितले आहे.