धम्मसंदेश आणि धम्मदान यात्रेचे वाई गोरखनाथ येथे आगमन ; सामुहिक विवाह सोहळ्यात सर्वधर्मीय १११ जोडपी विवाहबद्ध
नांदेड| सर्व मानवहितैषि सर्व कल्याणी विचारांचे महान उपासक महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांनी जगात समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि शांतीचा संदेश देत दया, क्षमा सद्विचाराने मानवाने अधिकाधिक प्रगती करावी अशी धम्मदेसना दिली. तथागताच्या २५६६ व्या जयंतीच्या पावन पर्वावर समाजात सर्व धर्मीय विवाह सोहळा ज्या पद्धतीने एकाच ठिकाणी संपन्न झाला तद्वतच एकोप्याने राहावे अशी अपेक्षा येथील अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी व्यक्त केली.
ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राची धम्मदान आणि धम्मसंदेश यात्रेचे आगमन वसमत तालुक्यातील वाई गोरखनाथ येथे झाले. राजूभैय्या नवघरे प्रतिष्ठानच्या वतीने १११ जोडप्यांच्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आ. बाबाजानी दुर्राणी, आ. राजू नवघरे, आ. विप्लव बाजोरिया यांच्यासह भिक्खू संघाची उपस्थिती होती. यावेळी बोलताना पंय्याबोधी म्हणाले की, कोणताही धर्म इतर धर्माचा द्वेष करण्याची शिकवण देत नाही. जातीय, धार्मिक अस्मितेसाठी आपण दोन गटात विद्वेषाची बिजे पेरीत असतो. हे येणाऱ्या पिढ्यांसाठी हीतकारक नाही. तेव्हा आपण सद्विचार आणि सद्भावनेने एकमेकाशी वागले पाहिजे. धार्मिक सौहार्दता जपली पाहिजे, असेही ते म्हणाले.
तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात शरद पवार, धनंजय मुंडे, जयप्रकाश दांडेगावकर, राजू नवघरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राजू नवघरे यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत देण्यात आलेल्या पाच रुग्णवाहिकेचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, वसमत विभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांच्यासह १११ नवदाम्पत्यांचे नातेवाईक तथा परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. संपूर्ण सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी राजूभैय्या सेवा प्रतिष्ठान मित्रमंडळाने परिश्रम घेतले.