एनसिपीचे अध्यक्ष शरद पवार, सीएम उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एकाच व्यासपीठावर येणार-NNL

गोदावरी अबर्नच्या " सहकारसूर्य " मुख्यालयाचे 14 मे रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार उदघाटन 


नांदेड।
गोदावरी अर्बन मल्टिस्टेट को-ऑप सोसायटीच्या " सहकारसूर्य " मुख्यालयाचा उदघाटन सोहळा दि.14 मे 2022 रोजी नांदेड येथे होणार असून  राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांच्या शुभहस्ते  उदघाटन होणार आहे. या सोहळ्याला  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.अशी माहिती गोदावरी अर्बनचे संस्थापक अध्यक्ष तथा खासदार हेमंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या उदघाटन सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गोदावरी अर्बनच्या अध्यक्षा सौ. राजश्री हेमंत पाटील  यांनी केले आहे.

कमी कालावधीमध्ये गोदावरी अर्बनचे नावलौकिक - गोदावरी अर्बनने अत्यंत कमी कालावधीमध्ये सहकार क्षेत्रात आपल्या कार्यातून नावलौकिक आणि ग्राहकांचा विश्वास संपादन केला असून त्याच विश्वासाला पुढे नेण्यासाठी गोदावरी अर्बनने आपला कार्यविस्तार वाढविला असून सभासद ,ग्राहकांना अधिकाधिक दर्जेदार सुविधा देण्यासाठी अत्याधुनिक सोयी सुविधांसह गोदावरी अर्बन सज्ज झाली असून त्याच दिशेचे पाऊल म्हणजेच  " सहकारसूर्य " या अत्याधुनिक सोयी सुविधांनी सज्ज असलेले मुख्यालय होय. 

" सहकारसूर्य " मुख्य इमारतीचे होणार उदघाटन - याच मुख्यालयाचा उदघाटन सोहळा दि.14 मे 2022 रोजी सकाळी 9 वाजता तरोडा नाका , पूर्णा रोड नांदेड येथे  मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये संपन्न होणार आहे .मुख्यालयाचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष तथा  माजी केंद्रीय  कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांच्या शुभ हस्ते  तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची व  केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. सोबतच नगरविकास मंत्रीएकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे  पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह हिंगोली, नांदेड,यवतमाळ आणि परभणी जिल्ह्यातील सर्व खासदार व आमदार  यांची उपस्थिती लाभणार आहे.

सहकार परिषदेचेही आयोजन - या उदघाटनाच्या निमित्ताने  सहकार परिषदेचे सुद्धा आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्रातील विविध पतसंस्थांचे अध्यक्ष तसेच संचालक उपस्थित राहणार आहेत. यावेळी होणाऱ्या मार्गदर्शन सोहळ्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे हे ग्रहणाधिकार भारतीय करार कायदा व भारतीय राष्ट्रीय भुगतान निगम सदस्यत्वासाठी आरबीआय व सहकार खात्याची धोरणे, या विषयावर तर महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर हे  नवीन सहकारी धोरण, आणि  महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे हे  पतसंस्थांपुढील आव्हाने व शासनाकडून अपेक्षा यावर तर फेडरेशन ऑफ  मल्टीस्टेट को-ऑप सोसायटीचे अध्यक्ष सुरेश वाबळे,हे  बहुराज्यीय  कायद्यातील अपेक्षित सुधारणा यावर तसेच भारतीय बँक कर्मचारी संघटनेचे सचिव देविदास तुळजापूरकर हे सामान्यांसाठी सहकारी चळवळीची आवश्यकता या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.सोबतच सहकार क्षेत्रातील विविध मान्यवरांची उपस्थित राहणार आहे.

कार्यक्रमासाठी  वातानुकूलित मंडपाचे नियोजन - उन्हाळ्याचा वाढता त्रास पाहता कार्यक्रमासाठी  वातानुकूलित मंडपाचे नियोजन करण्यात आले असून भगीरथ नगर येथे  1000 चारचाकी वाहने थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गोदावरी अर्बनचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी