नांदेड| सुंदर माझे कार्यालय उपक्रमांतर्गत नांदेड जिल्हा परिषदेत दिनांक 1 मे पासून विशेष स्वच्छता मोहिम राबविण्या येत आहे. आज जिल्हा परिषदेच्या सर्व कार्यालयातून स्वच्छता करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांनी विविध कार्यालयात जावून स्वच्छता मोहिमेची पाहणी करुन सिक्स बंडल पध्दती, कपाटात ठेवावयाच्या फाईल्स व त्याची वर्गवारी यासंदर्भात कर्मचा-यांशी संवाद साधून माहिती दिली. येत्या 15 मे पर्यंत कार्यालयीन स्वच्छता मोहिम चालणार आहे.
आज सकाळी नांदेड जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातून स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली. दरम्यान जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले यांनी सामान्य प्रशासन विभाग, ग्राम पंचायत विभाग, शिक्षण विभाग, स्वच्छ भारत मिशन, आरोग्य विभागासह विविध कार्यालयास भेटी देवून स्वच्छतेची पाहणी केली. यावेळी त्यांनी कर्मचा-यांशी संवाद साधून स्वच्छतेबाबत चर्चा केली.
कार्यालयात कार्यरत अधिकारी-कर्मचा-यांचा दिवसाचा एक तृतीयांश कालावधी कार्यालयात व्यतित केला जातो. कार्यालयातील वातावरण स्वच्छ, सुंदर व पोषक असल्यास त्यांची कार्यक्षमता वाढून त्याचा फायदा निश्चीतपणे प्रशासनास व सामान्य जनतेस होतो. तसेच यामुळे प्रशासन उत्तरदायी, सुलभ, स्वच्छ, पारदर्शी आणि गतिमान बनण्यास मदत होते. या बाबींचा विचार करता राज्य शासनाच्या विविध यंत्रणातील राज्यस्तर ते तालुका स्तरावरील सर्व कार्यालयांचे अंर्तबाह्य रुप बदलुन प्रशासनास गति देणे, प्रशासनात कार्यरत अधिकारी-कर्मचारी यांच्यात सकारात्मक बदल घडवून आणणे आवश्यक आहे. यासाठी नांदेड जिल्हा परिषदे अंतर्गत सर्व कार्यालयातून स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे.
जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत जिल्हा परिषद मुख्यालय, पंचायत समित्या व तसेच अंतर्गत कार्यालय, अंगणवाड्या, प्राथमिक व माध्यमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र/उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने इ. कार्यालयामध्ये सदरची कामे पुर्ण करुन कार्यालयीन वातावरण स्वच्छ व सुंदर ठेवणे अत्यावश्यक आहे. सर्व विभाग प्रमुख, सर्व गट विकास अधिकारी अंतर्गत सर्व कार्यालय प्रमुखांवर सुंदर माझे कार्यालय उपक्रम राबविण्याची जबाबदारी निश्चीत करण्यात आलेली आहे.
सुंदर माझे कार्यालय उपक्रमातंर्गत कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी फाईल पध्दत, सहासंच पध्दती व अभिलेख वर्गीकरण, नस्ती पध्दती, त्रिअक्षरी फाईल क्रमांक पद्धती आदी विषयाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नामदेव केंद्रे, रेखा काळम-कदम, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, समाज कल्याण अधिकारी आर.एच.एडके, जिल्हा कृषी अधिकारी तानाजी चिमनशेट्टे आदींची उपस्थिती होती.