करनाल/नांदेड। हरियाणातून नांदेडला येणारे विस्फोटक पदार्थ व अनेक हत्यारे हरियाणातील करनाल पोलिसांनी वेळेवर पकडून नांदेडकरांचा धोका टाळला असला तरी या सर्व प्रकारातून नांदेड पोलीस मात्र अनभिज्ञ होते. एकीकडे प्रख्यात बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येला एक महिना आज पूर्ण झाल्यानंतर या तपासात आजपर्यंत कुठलीही प्रगती नसल्याने नांदेडकरांत मात्र संताप व्यक्त होत आहे.
हरियाणाच्या करनाल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका संशयित चारचाकी गाडीमध्ये विस्फोटक असल्याची गोपनिय माहिती करनालचे पोलीस अधीक्षक गंगाराम पुणीया यांना मिळाल्यानंतर त्यांनी वेगाने हालचाली वाढविल्या. पोलिसांकडे असलेल्या रोबोटच्या माध्यमातून या गाडीची तपासणी करण्यात आली. तेंव्हा त्यात विस्फोटके असल्याची माहिती पोलिसांना गाडी तपासल्यानंतर मिळाली. या गाडीत काही विस्फोटकासह हत्यारे, बंदूका आणि काही जिवंत गोळ्या असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या गाडीतून पकडण्यात आलेले आरोपी महत्वाचे असून, त्यांची सध्या हरियाणा पोलीस कसून चौकशी करत आहेत.
दहशतवादी गुरुप्रित, अमनदिप, परमिंदर आणि भूमींदर अशी या आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार करनाल येथील राहणारा व नांदेडच्या वेगवेगळ्या गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेला फरार आरोपी हरविंदरसिंघ उर्फ रिंधा संधू हा आता बब्बर खालसा या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. तो सध्या पाकिस्तानमध्ये असून, त्याने ड्रोनच्या माध्यमातून ही साहित्य फिरोजपूर येथे पाठविले. आणि मग हे चार दहशतवादी सदरचे साहित्य घेवून नांदेडला येणार होते. नांदेडला येवून ते काय नियोजन करणार होते याची माहिती करनाल पोलीस घेत असून, मोठा घातपात यामुळे वाचला असल्याचे समोर आले आहे.
हरविंदरसिंघ उर्फ रिंधा संधू हा सध्या पाकिस्तानच्या एका संघटनेच्या आडून पाकिस्तानमध्ये राहत आहे. पूर्वी तो काही दिवस नेपाळमध्ये होता तेथून ते पाकिस्तानला गेल्याची माहिती पंजाब व हरियाणा पोलिसांना मिळाली असून, त्यानेच हा कट रचला असावा, असा संशय गंगाराम पुनीया यांनी व्यक्त केला आहे. हरियाणा पोलिसांच्या गुप्तेहेरांनी व करनाल पोलिसांनी नांदेडकरांना एका मोठ्या घटनेतून वाचविले असले तरी नांदेडच्या पोलीस यंत्रणेच्या गुप्त विभागाला याची मात्र कानोकान खबर नाही. याबद्दल मात्र आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत नांदेड पोलीस मात्र काहीच सांगावयास तयार नाहीत. पकडलेल्या आरोपीची हरियाणा पोलीस गोपनियरित्या चौकशी करत असून, त्यांचे नांदेडचे कनेक्शन व कुठला घातपात करणार होते, याची माहितीही ते घेत आहेत.
दरम्यान प्रख्यात बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर त्याच्या तपासासाठी विशेष पोलीस पथक नेमण्यात आले आहे. मात्र महिनाभरानंतर देखील या प्रकरणातील आरोपी अद्यापही सापडले नाहीत. नेमका कट कसा रचला गेला, बियाणीवर हल्ला करणारे व त्यांची नंतर हत्या करणारे आरोपी नेमके कुठून आले, याचाही शोध अद्याप नांदेड पोलिसांना लागू शकला नाही. उलट गेल्या महिन्याभरातील काही गोळीबाराच्या व खुनाच्या घटना लक्षात घेता नांदेडकरांची मात्र झोप उडाली आहे. आज ५ मे, संजय बियाणी यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला.
पोलिसांनी वेगवेगळी पथके निर्माण केली. वेगवेगळ्या यंत्रणेचाही वापर केला मात्र या प्रकरणाचे धागेदोरे पोलिसांना मिळू शकले नाहीत, उलट शहर व जिल्ह्यातील गुन्हेगारी या काळात वाढल्याचे दिसून आले. हरियाणातील घटना उघडकीस आल्याने पुन्हा एकदा नांदेडकरांची झोप उडाली असून, पोलीस यामुळे अधिक सतर्वâ झाले आहेत.