विनापरवाना उत्पादन करण्यात आलेल्या बनावट सौंदर्य प्रसाधनांचा मोठा साठा जप्त -NNL


मुंबई|
अन्न व औषध प्रशासन म. राज्य  गुप्तवार्ता विभागाच्या  माहिती आधारे दि. २४ मे २०२२ रोजी मे. ग्रूमिंग एन्टरप्राईस प्रा.लि. जुहू मुंबई या संस्थेची गुप्तवार्ता व बृहन्मुंबई  औषध निरीक्षकांच्या पथकाने धाड टाकून  तपासणी केली.  ही संस्था  भिवंडी, जि.ठाणे येथील एका सौंदर्य प्रसाधन उत्पादकाचे नाव व  परवाना क्रमांकाचा वापर करून विविध सौंदर्य प्रसाधनांचे विनापरवाना उत्पादन जुहू येथील जागेत करून त्याची विक्री मुंबई परिसरातील विविध ब्युटी पार्लर व सलून यांना व ऑनलाइनरित्या करीत असल्याचे आढळले.

मे. ग्रूमिंग एन्टरप्राईस प्रा.लि. यांचे वाकड पुणे या शाखेत सुद्धा तत्सम सौंदर्य प्रसाधनांचे विनापरवाना उत्पादन करीत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने दि. २४ मे २०२२ रोजी अन्न व औषध प्रशासन पुणे कार्यालयातील औषध निरीक्षकांनी रु.७.७३ लाख रुपयांची सौंदर्य प्रसाधने व त्यांच्या  उत्पादन करण्याकरिता लागणारे उपकरण, रिकाम्या बाटल्या व लेबल्स जप्त केले आहेत. अशाप्रकारे मुंबई व पुणे येथील कारवाईत एकूण  रु.२९.४४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

भिवंडी येथील उत्पादकास औषध प्रशासन ठाणे कार्यालयातर्फे  केवळ दोन  सौंदर्य प्रसाधने उत्पादन करण्याची परवानगी आहे, परंतू मे.ग्रूमिंग एन्टरप्राईस प्रा.लि. जुहू मुंबई ही संस्था उक्त उत्पादकाच्या नावाने  विनापरवाना  व बनावट  शाम्पू, कंडीशनर, बेअर्ड वॉश, हेअर ट्रीटमेंट व विविध केराटीन युक्त सौंदर्य प्रसाधनाचे उत्पादन जुहू येथील पत्त्यावर करून त्याची विक्री रु. ७५०/- ते २८०००/- या किमतीत करीत असल्याचे आढळले. 

त्यामुळे औषधे सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४० च्या कलम १७ (D) (d) व 18 (c) चे उल्लंघन झाल्याने क्षेत्रीय औषध निरीक्षक, बृहन्मुंबई यांनी २२.७१ लाख रुपयांचे सौंदर्य प्रसाधने व त्यांच्या  उत्पादन करण्याकरिता लागणारे उपकरण, रिकाम्या बाटल्या व लेबल्स जप्त केले आहेत तसेच ५ सौंदर्य प्रसाधनांचे नमुने चाचणीसाठी घेऊन ते अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळा मुंबई येथे पाठविले आहेत व त्याचे अहवाल प्राप्त झाल्यावर मे. ग्रूमिंग एन्टरप्राईस प्रा.लि. जुहू मुंबई यांच्या विरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

ही कारवाई श्री.रवी, औषध निरीक्षक  गुप्तवार्ता विभाग, सर्वश्री एड्लावर, राठोड, डोईफोडे व साखरे औषध निरीक्षक बृहन्मुंबई विभाग व सर्वश्री कवटिकवार, सरकाळे, श्रीमती शेख, औषध निरीक्ष, पुणे    श्री.रोकडे, सहायक आयुक्त (गुप्तवार्ता) व श्री.गादेवार सहायक आयुक्त, पुणे यांनी पार पाडली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी