नांदेड| मराठी चित्रपटसृष्टीतील आपल्या कसदार आणि नैसर्गिक अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पाडणारे सुप्रसिद्ध सिनेअभिनेते मिलिंद शिंदे २१ मे रोजी नांदेड शहरात येत असून ते कुसुम सभागृहात होत असलेल्या एकदिवसीय महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी राज्यस्तरीय साहित्य संमेलनात उपस्थित राहणार असल्याची माहिती निमंत्रक जी. पी. मिसाळे आणि संयोजन समितीचे अध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे यांनी दिली.
यावेळी स्वागताध्यक्ष बालाजी इबितदार, सत्यशोधक फाऊंडेशनचे अध्यक्ष कोंडदेव हटकर, मानव विकास संशोधन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष राज गोडबोले, संयोजन समितीचे उपाध्यक्ष प्रभू ढवळे, कार्याध्यक्ष एन. टी. पंडित, नागोराव डोंगरे, रणजीत गोणारकर आदींची उपस्थिती होती. मिलिंद शिंदे एक भारतीय अभिनेता आणि चित्रपट दिग्दर्शक आहेत. ते मराठी, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करतात.
गिरीश कर्नाड यांच्या हिंदी दूरचित्रवाणी मालिका आणि कन्नड चित्रपटाद्वारे त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. नटरंग या मराठी चित्रपटातील भूमिकेसाठी ते प्रख्यात आहेत. त्यांनी मराठी चित्रपटांची भूमिका, दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. 'झुलवा', 'ती फुलराणी', 'कथा अरुणाची' यांसारखी लक्षवेधी नाटके आणि 'नॉट ओन्ली मिसेस राऊत', 'नटरंग', 'पारध' अशा तब्बल पंचवीसहून अधिक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता म्हणजे मिलिंद शिंदे. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांतून आणि मालिकांतून प्रभावीपणे काम केले आहे. 'नाच तुझंच लगीन हाय' हा मिलिंद शिंदे यांनी दिग्दर्शित केलेला पहिलाच चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.