मे अखेर पर्यंत कारखाने चालवून लातूर जिल्ह‌्यातील संपूर्ण ऊसाचे गाळप करावे – पालकमंत्री अमित देशमुख -NNL

• जवळपासची गावे विभागून घेऊन जलद गाळपासाठीचे नियोजन करावे

• सभासद व बिगस सभासद भेद न करता सर्वांचा ऊस गाळप व्हावा हे पहावे

• सोलापूर व नांदेड जिल्हातील बंद होत असलेल्या कारखान्यातील यंत्रणा मागवून घ्यावी

• जिल्हयात कोणाचाही ऊस शिल्लक राहणार नाही असा शेतकऱ्यांना दिलासा दयावा


लातूर|
जिल्हयातील साखर कारखान्यानी जवळपासच्या गावांची परस्परात विभागणी करून घेऊन जलद ऊस गाळपाचे नियोजन करावे मे अखेर पर्यंत कारखाने चालवून जिल्हयातील संपूर्ण ऊसाचे गाळप करावे, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.

पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात लातूर जिल्हयात आजअखेर गाळपा अभावी शिल्लक राहिलेल्या ऊसाच्या संदर्भाने जिल्हा प्रशासन, साखर आयुक्तालय व सहकारी तसेच खाजगी साखर कारखान्याच्या व्यवस्थापना सोबत आज संयुक्त आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हयातील साखर कारखान्याची गाळप क्षमता, आजपर्यंत झालेले गाळप, सदया शिल्लक असलेला ऊस, ऊसतोडणी यंत्रणेची सदयस्थिती या संदर्भाने चर्चा झाली. जिल्हयात आणखी सभासद व बिगर सभासद मिळून जवळपास ३ लाख मे. टन ऊस शिल्लक असल्याची माहिती यावेळी समोर आली.

यावेळी झालेल्या बैठकीत पालकमंत्री देशमुख म्हणाले, सर्व साखर कारखाने यांनी जवळपासची गावे विभागून घेऊन जलद गाळपासाठीचे नियोजन करावे, ऊसतोडणी करतांना सभासद व बिगर सभासद असा भेद न करता सर्वांचा ऊस गाळप व्हावा या दृष्टीने पहावे, सोलापूर व नांदेड जिल्हातील बंद होत असलेल्या कारखान्यातील यंत्रणा तातडीने मागवून घ्यावी, शेजारी जिल्हयात बंद होत असलेल्या कारखान्यात हार्वेस्टरचे अधिगृहन करावे, लातूर जिल्हाधिकारी यांनी नांदेड व सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून तोडणी यंत्रणेच्या अधिगृहना बाबत कार्यवाही करावी, कारखान्याला होणारा पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणने अखंड वीजपूरवठा करावा, जिल्हयात कोणाचाही ऊस शिल्लक राहणार नाही असा शेतकऱ्यांना दिलासा दयावा, ऊसउत्पादक शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण निर्माण करणाऱ्या अफवा पसरवल्या जाणार नाहीत याची विशेष काळजी घ्यावी आदी निेर्दश या बैठकीवेळी संबंधितांना त्यांनी दिले.

अधिक काळ कारखाने चालवल्यामुळे कारखान्याचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी शासनाच्या वतीने साखर ऊतारा घट आणि ऊस वाहतुकीसाठी अनुदान दिले जाणार असल्याचे सांगून ऊसतोडणी यंत्रणा उपलब्ध करून देण्यासाठी नांदेडमध्ये राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री अशोकरावजी चव्हाण व सोलापूर जिल्हयातील आमदार बबनदादा शिंदे यांना आपण स्वत: बोलणार असल्याचे यावेळी पालकमंत्री देशमुख यांनी म्हटले.

या बैठकीस जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, मनपा आयुक्त अमन मित्तल, सचिन रावळ विभागीय सहसंचालक साखर , जिल्हा उपनिबंधक सहकार एस.आर. नायकवडी , मांजरा कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रीशैल्य उटगे, रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, मारूती महाराज सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपत बाजुळगे, रेणाचे व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे, ट्वेंटीवन शुगरचे व्हा. चेअरमन विजय देशमुख, विलास कारखाना कार्यकारी संचालक संजीव देसाई, रेणा कारखाना कार्यकारी संचालक मोरे, टवेन्टिवन शुगसचे कार्यकारी संचालक समीर सलगर, विलास कारखाना युनीट – २ कार्यकारी संचालक ए.आर.पवार, जागृती कारखाना कार्यकारी संचालक सुनील देशमुख, संत मारूती महाराज कारखाना कार्यकारी संचालक दत्ता शिंदे, सिध्दी शुगरचे कार्यकारी संचालक होनराव, कार्यकारी संचालक साई शुगर, शेतकी अधिकारी कल्याणकर, जहागीरदार, जाधव, मिलीद पाटील आदी संबंधित विभागाचे अधिकारी सर्व कारखान्याचे पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात बोगस बियाणे विक्रीवर कृषी विभागाने नियोजन करून निर्बंध आणावेत; बियाण्यावर निर्धारित दरापेक्षा अधिकचा दर लावणाऱ्यांवर कडक कारवाई करावी - पालकमंत्री अमित देशमुख

जिल्ह्यात बोगस बियाणे विक्रीवर कृषी विभागाने नियोजन करून निर्बंध आणावेत, बोगस बियाणे बाजारात विक्री होणारच नाही, याची दक्षता घ्यावी तसेच एखाद्या कंपनीचे बियाणे उगवले नाही, अशा कंपनीवर जिल्ह्यात शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देणार नाही तो पर्यंत निर्बंध घालण्याबाबतची प्रशासकीय कार्यवाही करावी असे पालकमंत्री अमित देशमुख यांनी निर्देश दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात लातूर जिल्हा खरीप हंगामपूर्व - 2022 च्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीस यावेळी दृकश्राव्य प्रणालीद्वारे ( ऑनलाईन ) आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. बाबासाहेब पाटील, आ. रमेश कराड, तर प्रत्यक्ष आ.धीरज विलासराव देशमुख, आ.अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, कृषी विभाग जलसंपदा विभाग, महावितरण विभाग, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, संबंधित विभागाच्या विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ज्या बँका पीक कर्ज देत नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश देऊन पीक कर्जाच्या बाबतीत शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची एन ओ सी मागितली जाणार नाही असे फलक बँकांच्या दर्शनी भागात लावण्याची कार्यवाही करावी अशा सूचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी दिल्या. घरचे बियाणे वापरणाऱ्यांनी उगवणी टेस्ट करून आणि पुरेशी ओल झाल्यानंतरच पेरणी करावी ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावी असे सांगून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अधिकाधिक सौर पंप बसविण्यासाठी प्रोत्साहन देण्याबाबतही पालकमंत्री यांनी यावेळी निर्देश दिले.

विजेचा अपव्यय थांबविण्यासाठी उपाय योजना - जिल्ह्यात अनेक ठिकाणी खांबावर दिवसा दिवे लागलेले दिसतात हा विजेचा अपव्यय आहे. स्थानिक स्वराज्य संस्थानी यावर लक्ष द्यावे ही अत्यंत गंभीर बाब आहे. दिवस मावळला की आपोआप लाईट लागण्याची आणि दिवस उगवला की बंद होण्याची डिजिटल यंत्रणा बसवाव्यात आणि हा अपव्यय थांबवावा असे आवाहनही पालकमंत्री यांनी यावेळी केले.

पी.एम. किसान योजनेबाबत कार्यवाही - पी एम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारा लाभ, त्यात असलेल्या त्रुटी ताबडतोब काढून पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी सर्व संबंधित यंत्रणानी प्रयत्न करावे, तसेच कृषी सहायकांनी पूर्ण क्षमतेनी काम करावे, त्यासाठी त्यांच्यावर नियंत्रण ठेवावे असे निर्देशही पालकमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी दिले. महावितरणला किती निधी उपलब्ध झाला आणि किती खर्च झाला याचाही आढावा घेण्यात आला. यामध्ये मागील तीन वर्षात जिल्हा नियोजन समितीकडून दिलेल्या निधीतून किती ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले आहेत, याचाही आढावा यावेळी घेण्यात आला. एखादा कंत्राटदार जर यासंदर्भात काम करीत नसतील तर त्या कंत्राटदारावर कारवाई करण्याच्याही सूचना या बैठकीत पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिल्या.

कोणीही लिंक पध्दतीने बियाणे विकणार नाही याची काळजी घेण्याबाबत दक्ष राहून पेरणी पुर्वी जिल्हयात रासायनीक खताची उपलब्धता करून घ्यावी. खताच्या योग्य वापराबाबत शेतकऱ्यांत जागृती निर्माण करून घरच्या घरी मिश्र खत तयार करण्या बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याबाबतही पालकमंत्री अमित देशमुख यांनी कृषी विभागाला सांगितले. महाडीबीटी वेबसाईट वापरात सुसुत्रता आणावी असे सांगून योजनांसाठी अर्ज दाखल करतांना शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे तसेच मंजूर योजना संदर्भात शेतकऱ्यांना वेळीच मार्गदर्शन करावे.कृषी योजना संबंधीची सर्व माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचावी. शेतकऱ्यांना कृषी विमा मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेण्याबाबतही पालकमंत्री यांनी निर्देश दिले.

कृषी विमा संदर्भात इतर जिल्ह्यासाठी न्यायालयाकडून आलेल्या निकालाचा अभ्यास करून न्यायालयाच्या निकालानुसार लातूर जिल्हयात पिकवीमा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत या सुचनासह बैठकीत झालेल्या चर्चेच्या संदर्भाने तातडीने अमंलबजावनी करून आठ दिवसात अनुपालन अहवाल लोकप्रतिनिधींना मिळेल या संबंधिचे निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी या बैठकी दरम्यान दिले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी उपस्थित मुद्दे व अनुपालन अहवाल, लातूर जिल्हा सर्वसाधारण माहिती, पर्जन्यमान, पावसाचा खंड, अतिवृष्टी, क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता, प्रधानमंत्री पिक विमा योजना, प्रधानमंत्री फळपिक विमा योजना, गोपिनाथ मुंडे अपघात विमा योजना, बियाणे नियोजन खरीप-2022, खताचे नियोजन – मागणी व पुरवठा, गुण नियंत्रण नियोजन व कार्यवाही, कृषि विस्तार विषयक योजना, फलोत्पादन घडीपत्रिका, राज्यस्तरीय सोयाबीन परिषद, विकेल ते पिकेल, आत्मा, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, बांबु लागवड, शासकीय हमी भाव खरेदी, सिंचनाची सद्यस्थिती, महावितरण आदिबाबतची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

सर्वश्री आमदार महोदयांच्या सुचना लक्षात घेवून जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी संयुक्तिक समन्वयाने त्यांच्या सुचनांचे निराकरण करण्यात यावेत. तसेच त्यांचा अहवाल कृषि विभागाने सर्वश्री आमदार महोदयांना आठ दिवसाच्या आत त्यांच्या सुचनांचे अनुपालन व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पाठविण्यात यावा, असेही पालकमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी सुचना केल्या.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी