नांदेड। औरंगाबाद येथे नुकतेच संपन्न झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेत नांदेड जिल्हा मनसे अध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार यांना 10 लाख रुपयांचा फटका बसला आहे. राज ठाकरेंच्या सभेला तुफान गर्दी असल्याने याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी नांदेड जिल्हाध्यक्ष जहागीरदार यांच्या गळ्यात असलेल्या 200 ग्रॅम वजनाच्या अंदाजे 10 लक्ष रुपये किंमतीच्या सोन्याच्या साखळीवर चोरट्यांनी हात साफ केला.
औरंगाबाद येथे 1 मे रोजी आयोजित केलेल्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या जाहीर सभेसाठी नांदेड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मनसैनिक दाखल झाले होते. राज ठाकरेंच्या लाखोंच्या संख्येने गर्दी झाली होती. यासभेसाठी मनसेचे नांदेड जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार हे देखील हजर झाले होते. नांदेड जिल्ह्यातील गोल्डमॅन म्हणून मॉन्टीसिंह जहागीरदार यांची ओळख आहे.
मॉन्टीसिंग जहागीरदार हे आपल्या अंगावर जवळपास 50 तोळे सोने नेहमी परिधान करतात. पण राज ठाकरे यांच्या सभेच्या दिवशी चोरट्यांनी त्यांच्या अंगावरील सोन्यावर डोळा ठेवून आपला उद्देश साधला. त्यांची दहा लाख किंमतीची आणि 200 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन लंपास केली. या सभेत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असतांना देखील अंगावरील चैन चोरीला गेल्याने जहागीदार यांना मोठा फटका बसला आहे.
मॉन्टीसिंग जहागीरदार हे मूळचे नांदेड येथील गरुद्वारा चौरस्ता येथील रहिवासी आहेत. त्याच ठिकाणी त्यांचे संतकृपा हे व्यापारी संकुल असून, शहरात विविध व्यापारी संकुल, प्लॉटिंग बिझनेस, फायनान्स कंपनी, हॉटेल्स असा त्यांचा व्यवसाय आहे. ते गेल्या 16 वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत काम करतात. तर मुंबई, नाशिक, औरंगाबाद, पुणे याठिकाणी राज ठाकरे यांनी केलेल्या विविध आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. वयाच्या 12 व्या वर्षापासून मॉन्टी यांना अंगावर सोने परिधान करण्याची प्रचंड आवड आहे. ज्यात ते गेल्या 20 ते 22 वर्षापासून 70 ते 80 तोळे एवढे भरगच्च सोन्याचे आभूषणे अंगावर परिधान करतात. त्यामुळे त्यांना नांदेडचा गोल्डनमॅन म्हणून जिल्हाभरात ओळख आहे.