नांदेड| नांदेड येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर आज दुपारी गोवर्धनघाट स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर अंत्ययात्रा येताच प्रक्षुब्ध नागरिकांनी व कोलंबीच्या गावकऱ्यानी पोलीस यंत्रणेच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करुन तब्बल चाळीस मिनिटे अंत्ययात्रा थांबवली. त्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
नांदेड येथील प्रख्यात बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची काल सकाळी ११ वाजता अज्ञात सराईत असलेल्या आरोपींनी दिड मिनिटात गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. या हत्येमुळे सबंध नांदेड शहर व जिल्ह्यात संताप व्यक्त करण्यात आला. आनंदनगर भागात अनेक दुकानावर दगडफेक झाली. त्यानंतर शहरातील दुकाने बंद झाली. त्यांचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपविण्यात आला. काल सायंकाळपासून ते आज अकरा वाजेपर्यंत त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी प्रचंड गर्दी झाली होती. कोलंबी गावचे ते रहिवाशी असल्याने गावकऱ्यानी टाहो फोडला. घरासमोरच गावकऱ्यानी पोलीस यंत्रणेच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी सुरु ठेवली. पालकमंत्री अशोक चव्हाण येईपर्यंत ही घोषणाबाजी सुरुच होती.
आज सकाळी ११.३० वाजता त्यांच्या अंत्ययात्रेला प्रारंभ झाला. आज नांदेड शहर पूर्णतः कडकडीत बंद होते. अत्यंत मनमिळावू आणि सर्वांशी चांगले वागणारे अशी त्यांची ख्याती असल्याने तसेच सर्वच राजकीय पक्षांशी त्यांचे संबंध चांगले असल्याने त्यांच्या मृत्यूने सर्वच जण हळहळले. जवळपास आठ हजार लोकांना रोजगार त्यांच्यामुळे उपलब्ध झाला होता. किफायतशीर दरात मिळणारी घरे तसेच बिओटी तत्वावर त्यांनी केलेले बांधकाम तसेच पाडव्याला सुरु झालेल्या वेगवेगळ्या योजना यामुळे सर्वांनीच त्यांचे कौतूक केले होते. मात्र दृष्ट लागावी की काय..? अशा परिस्थितीत त्यांची हत्या झाली. अंत्ययात्रा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर रोखली.
संजय बियाणी यांच्या पत्नीचा पोलिसांवर रोष - संजय बियाणी हे दानशूर व्यक्तीमत्व होते. त्यांची निर्दयीपणे झालेली हत्या ही धक्कादायक असून, नांदेडच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते. बियाणी यांच्या कुटुंबियांनी केलेल्या मागणीनुसार निश्चितच या घटनेचा तपास अतिशय बारकाईने केला जाईल, अशी ग्वाही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
बियाणींच्या पत्नीचा आक्रोश - संजय बियाणी यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पत्नीने केलेला आक्रोशानंतर सर्वच उपस्थित हळहळले. दरम्यान बियाणींच्या पत्नीने कायदा व सुव्यवस्थेवर थेट आरोप करत पोलिसांच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे. तसेच अगोदर हत्येची सुपर देणाऱ्या त्या हुकूमच्या एक्क्याला पकडा आणि त्या आरोपीं शासन करा, अन्यथा या हत्येच्या घटनेच्या चौकशीसाठी मुंबई, दिल्ली पर्यंत जाईल असे त्यांनी माध्यमांना सांगितले.