खरीप हंगामासाठी ग्राम कृषी विकास आराखडे तयार करावेत - विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांचे निर्देश -NNL


नांदेड|
जिल्ह्यातील प्रत्येक गावांच्या कृषी विषयक गरजा पूर्ण करण्यासाठी नियोजन आवश्यक आहे. त्यादृष्टीने यंदाच्या खरीप हंगामात गावांचे सर्व समावेशक ग्राम कृषी विकास आराखडे तयार करावेत. सर्व कामे विहित वेळेत पूर्ण व्हावीत यांची योग्य ती खबरदारी घेण्याचे लातूर कृषी विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांनी दिले. आज कुसुम सभागृहात आयोजित खरीप हंगाम 2022 पूर्व तयारी कार्यशाळेत त्यांनी मार्गदर्शन केले. 

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. बी.चलवदे, कृषि उपसंचालक श्रीमती एम. आर. सोनवणे उपविभागीय कृषी अधिकारी डी.एम. तपासकर, एस. बी. शितोळे. कृषी विकास अधिकारी चिमणशेट्टे,  कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डी. ए. देशमुख, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील तंत्र अधिकारी बी.व्ही वीर, एम.के. आसलकर, श्री. भोर यांच्यासह उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक यांची उपस्थिती होती. 

खरीप हंगामाचे नियोजन जिल्हास्तर तसेच राज्यस्तरावर केले जाते. यात गावांच्या गरजांचा  आवश्यक त्या प्रमाणात समावेश होत नसल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर अधिकारी, लोकप्रतिनिधी, प्रगतशील शेतकरी यांचा समावेश असलेली ग्राम कृषी विकास समिती स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला.  सदर समिती गावातील जमीन, पर्जन्यमान, सिंचन सुविधा, उपलब्ध साधन सामग्री, दळणवळण, माती परीक्षणावर आधारित जमीन प्रकार आदी बाबींचा विचार करुन येत्या खरीप हंगामासाठी ग्राम कृषी विकास आराखडा अंतिम करेल असे दिवेकर यांनी स्पष्ट केले. 

सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणी, सोयाबीनची बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी, खत बचत मोहीम, जैविक खतांचा वापर, बीज प्रक्रिया इ. मोहीमद्वारे संबंधित कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांमध्ये जागृती करावी, असेही दिवेकर म्हणाले.  कार्यशाळेत  विविध मोहिमांची माहिती पुस्तिका, ग्राम कृषी विकास आराखड्याचे मार्गदर्शिकाचे कृषी सहाय्यक यांना वाटप करण्यात आले. 

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग  योजना, मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी सर्व तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, आत्मा विभागाचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, पोकरा समुह सहाय्यक यांची उपस्थिती होती.


 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी