नायगाव, दिगंबर मुदखेडे। सत्संगांची महत्ता भगवंताचे तिर्थक्षेत्र व नानाविध रूप, अवतार विषेशता यांचे महत्त्व आणि कलयुगात तिरूपति श्रीव्यंकटेश बालाजीचे वैशिष्ट्यपूर्ण महत्त्व प्राप्त झाले आहे असे प्रतिपादन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवताचार्य प्रणव महाराज धानोरकर यांनी केले आहे.
ते नायगाव येथे आयोजित श्री व्यंकटेश बालाजी यांचे चरित्र कथेत बोलत होते. धानोरकर महाराज पूढे म्हणाले, व्यंकटाचल पर्वताच्या नामांचा इतिहास त्यात सत्ययुगात वृषभासुराला भगवान विष्णूनी वरदान दिल्यामुळे सत्ययुगात वृषभाद्री असे नाव पडले असून त्रेतायुगात मारुतीच्या प्राप्तीसाठी अंजना मातेनी तपस्या केल्यामुळे अंजाद्री असे नाव पडले तर द्वापरयुगात शेषनागाने पर्वतास वेढल्याने शेषाचल असे नाव पडले आहे. मराठवाड्यात श्री व्यंकटेश बालाजी चरित्र कथा प्रथमच होत आहे. त्यामुळे या कथेला विशेष महत्त्व प्राप्त झाले असे सांगून धानोरकर महाराज यांनी आजच्या कलियुगातील अनेक वास्तव परिस्थितीचा आढावा घेतला.
श्री वेंकटेश बालाजी भगवंताची कथा सांगताना भारतातील अनेक तीर्थक्षेत्राचा महिमा व त्याची जागृती या विषयी परमपूज्य प्रणव महाराज धानोरकर यांनी विशेष सांगून चारधाम, सप्तपुरी, बारा ज्योतिर्लिंग, साडेतीन शक्तीपीठे यासह अनेक शक्ती पिठाचा विशेष महिमा सांगितला. सर्वात प्रथम भक्ती सत्संग आणि भगवंताची कथा श्रवण करावी. कथा श्रवणाने आपल्या जीवनातील मोह संपुष्टात येतो. यासह निष्काम भक्तीची लक्षणे सांगितली. श्री व्यंकटेश बालाजी भगवान धना सह मोक्ष प्राप्त करून देतो असेही सांगितले आहे.