गुत्तेदारासह - राजकीय इच्छाशक्तीचा अभाव
किनवट,माधव सुर्यवंशी| इस्लापुर ते किनवट असा प्रवास करायला राष्ट्रीय महामार्ग मंजुर झाला त्यापुर्वीच्या रस्त्यावर प्रवास करतांना ४० मिनिटांचा वेळ लागत असे तर राष्ट्रीय महामार्ग मंजुर होऊन सुमारे ६ वर्षाचा कालावधी होऊन गेला आहे. कंत्राटदाराने काम सुरु करुन हि जवळपास तेवढाच कालावधी झालेला आहे. परंतु परिस्थिती एवढी विदारक आहे कि, आज या सुमारे ४५ कि.मी मार्गावर प्रवास करतांना २ ते ३ तास वेळ लागतो. कारण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचा-यांनी याकडे दुर्लक्ष केले असुन, या करिता राजकिय इच्छा शक्तीचा देखिल अभाव असल्याचे दिसत आहे.
यापुर्वी माजी आमदार प्रदीप नाईक यांनी विधानसभेत या मार्गाविषयी प्रश्न विचारला असता तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तत्काळ २० कोटी रुपये दुरुस्ती व देखभाल करण्यासाठी मंजुर करुन संबधित गुत्तेदाराचे कंत्राट रद्द केले होते. परंतु नंतरच्या काळात माशी कोठे शिंकली या विषयी कोणीच काही बोलायला तयार नसल्याने नागरीकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. तर अनेकांनी जिव गमावला आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ ए चे काम मागील सहा वर्षापासुन या मार्गावर चालु आहे मुळात ते दोन वर्षात पुर्ण करणे आवश्यक होते. याचे कारण आहे ते या मार्गावरील संबधित अधिकारी, अभियंता व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कारण जो पर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे काम चालु आहे. तो पर्यंत ज्या ठीकाणी काम चालु त्या ठीकाणाचे देखभाल करण्याची जबाबदारी देखिल राष्ट्रीय महामार्ग च्या कंत्राटदाराची असुन तसे त्याच्या निविदेमध्ये नमुद केलेले आहे. तरी देखिल किनवट ते इस्लापुर या मार्गावर अनेक ठीकाणी खोदुन ठेवलेले आहे, दिशादर्शक फलक लावलेले नाही, कोणत्याही एका कामास पुर्ण न करता अनेक ठीकाणी काम अर्धवट ठेवण्यात आलेले आहे. पुलांचे काम देखिल अर्धवट ठेवण्यात आलेले आहे. काम चालु नसतांना देखिल खोदुन ठेवण्यात आले आहे. अशा वेळी एखादी मोठी दुर्घटना घटीत व्हावी याची वाट पाहत आहेत का असा सवाल राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे ता अध्यक्ष प्रकाश राठोड यांनी केला आहे.
माध्यमांशी बोलतांना प्रकाश राठोड यांनी सांगितले आहे कि, राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी आमच्या संयमाचा अंत पाहु नये आमचा सयंम सुटल्यास तिव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल कारण या अशा मुजोर अधिका-यांना आंदोलनाचीच भाषा समझते तर अशा मुजोर अधिका-यांना आंदोलनाचीच भाषा समजत असेल तर आम्ही असंख्य नागरीकांना घेऊन या मार्गावर लवकरच तिव्र स्वरुपाचे आंदोलन करणार आहोत. तरी या मार्गावरील संबधित कंत्राटदाराने व अधिका-यांनी या मार्गाची स्थिती लवकरात लवकर सुधारावी अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरु अशा इशारा त्यांनी दिला आहे.