एकपात्री अभिनय स्पर्धेतून विजेत्या कलाकारांना आगामी सिनेमामध्ये संधी देणार -सिने कलावंत डॉ. सुधीर निकम -NNL


नांदेड|
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यापीठाने एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजित केलेली आहे. या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून स्पर्धक आलेले आहेत. या स्पर्धेकामधुन जे पहिले तीन स्पर्धक पारितोषिक मिळवतील त्यांना मी माझ्या आगामी सिनेमांमध्ये कला सादर करण्याची संधी देणार आहे. असे मत सिनेकलावंत, लेखक, दिग्दर्शक, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा मधील महाराजांचे पात्र सादर करणारे डॉ. सुधीर निकम यांनी व्यक्त केले. 

ते आज दि. २६ रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ललित व प्रयोगजीवी कला संकुलाच्या नाट्यशास्त्र विभागातर्फे आयोजित एकपात्री अभिनय स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून त्यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर त्यांच्यासमवेत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, अधिष्ठाता डॉ. वैयजंता पाटील, सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिपक बच्चेवार, परीक्षक डॉ. जयंत शेवतेकर, संकुलाचे संचालक डॉ. पी. विठ्ठल यांची उपस्थिती होती. 

पुढे ते म्हणाले कलेमध्ये एवढी ताकत आहे की, प्राण्यांना माणूस आणि माणसांना देव बनवते. आपल्या भागातही अनेक कलाकार आहेत. गरज आहे ती त्यांना संधी देण्याची. त्यामुळे मी माझ्या आगामी चित्रपटांमध्ये येथील कलाकारांना संधी देणार आहे. डॉ. निकम यांनी गोष्ट छोटी डोंगराएवढी, खोपा, गड्या आपला गाव बरा, सरगम, गुप्तधन, पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा, पिचकारी, गाजराची पुंगी, व्यसन, बायको उडाली भुर्र, जय सत्यमेव जयते बोला इ. चित्रपटामध्ये अभिनय केलेला आहे. या शिवाय ते उत्कृष्ट लेखक आणि दिग्दर्शक आहेत. 

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपामध्ये म्हणाले की, आमच्या विद्यापीठातील कलाकार सिनेमा क्षेत्रात मोठा कलाकार होऊन उदयास आल्यानंतर या विद्यापीठाचे नाव निश्चितच मोठे होईल, सुधीर निकम यांनी ही संधी आमच्या कलाकारांना देणे म्हणजे त्यांच्यासाठी एक मोठे कलेचे दार उघडून देणे होय. या साठी डॉ. निकम यांचे त्यांनी विशेष आभार मानले. या बरोबरच प्रा. जयंत शेवतेकर, प्रा. पी. विठ्ठल, कार्यक्रमाच्या समन्वयिका डॉ. अनुराधा जोशी यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. 

या स्पर्धेमध्ये तीन कलाकारांना प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ पाच अनुक्रमे ११ हजार, ७ हजार, ३ हजार आणि उत्तेजनार्थ १ हजाराचे ५ बक्षिसे असे रोख पारितोषिक देण्यात येणार होते. पण  एैनवेळी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. दिपक बच्चेवार यांनी त्यामध्ये त्यांच्यातर्फे रु. १५००० हजार एवढी वाढ केली. त्यामुळे आता ते रोख पारितोषिक अनुक्रमे १६ हजार, १० हजार व ५ हजार आणि उत्तेजनार्थ प्रत्येकी २ हजार रुपये असे द्यावयाचे ठरले आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून ९० कलाकारांनी सहभाग घेतला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, औरंगाबाद व नांदेड येथील कलाकार येथे आलेले आहेत. 

या स्पर्धेच्या उद्घाटनाचे सूत्रसंचालन प्रा. रतन सोमवारे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. किरण सावंत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयिका डॉ. अनुराधा जोशी, रत्नाकर जोशी, शिवराज शिंदे, दिपाली देशमुख, अस्मिता साबळे यांच्यासह संकुलातील कर्मचारी व विद्यार्थी परिश्रम घेत आहेत. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी