नांदेड| नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यातून महावितरण कंपनीची 151 कोटी रुपये विक्रमी वसुली केल्याबद्दल मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्यावतीने मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांचा सत्कार करण्यात आला.
महावितरण कंपनीचे नांदेड झोनचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी अभियंता व कर्मचार्यांच्या सहकार्याने वीज बिलाची थकीत वसुली मोहिम राबविली. शेतकरी व वीज ग्राहकांना थकीत विज बिला संदर्भात माहिती देवून त्याचे महत्व पटवून दिले. मार्च अखेर नांदेड झोन मधून 151 कोटी रुपये थकीत वीज बिलाची वसुली केली. ही मोहिम यशस्वीपणे राबविणारे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांचा मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्यांनी शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.
तसेच महावितरणचे अधिक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी वीज बिलाची 89 कोटी रुपये व कार्यकारी अभियंता जनार्धन चव्हाण यांनी 27 कोटी 50 लाख रुपये वसुली केली. त्यांचाही मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष सिध्दार्थ पाटील, झोन अध्यक्ष एस.एम.घुले, प्रमोद बुक्कावार, सदानंद कांबळे, गणेश मुरकुंदे, सूर्यकांत गोणारकर, एस.एम.टोंम्पे आदी उपस्थित होते.