नांदेड| महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम आयोजित केले गेले आहेत. याचे प्रातिनिधीक उद्घाटन सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या उपक्रमाची सविस्तर माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी दिली. यावेळी दैनिक सम्राटचे जिल्हा प्रतिनिधी संभाजी कांबळे ॲड. अनुप आगाशे ॲड. अंकुश बर्डे आणि नांदेड महानगरपालिकेचे उपअभियंता शिवाजी बाभरे यांची उपस्थिती होती.
नांदेड जिल्ह्यातून सर्व 16 तालुक्यांमध्ये शासकीय वसतीगृहे, शासकीय निवासी शाळा, बहुजन कल्याण विभागाच्या विजाभज आश्रमशाळांमध्ये प्रवेशीत विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, लघु नाट्य स्पर्धा घेण्यात आल्या. या सर्व उपक्रमात सुमारे 735 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक कार्य व योगदान, भारतीय संविधानाचे महत्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन व चरित्र तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक योगदान याबाबत नव्या पिढीपर्यंत, युवकांमध्ये माहिती पोहचावी, त्यांना स्वत:चे विचार मांडता यावेत यादृष्टीने आम्ही अधिक भर दिल्याचे सहायक आयुक्त तेजस माळवदकर यांनी सांगितले. यातील गुणवंतांना राज्यस्तरावर संधी दिली जाईल, असे समाज कल्याण अधिकारी बापू दासरी यांनी माहिती दिली.
9 एप्रिल रोजी या उपक्रमांतर्गत रक्तदान शिबीर, 11 एप्रिल रोजी महात्मा फुले जयंती साजरी करणे, महात्मा फुले यांचे सामाजिक कार्य याविषयी व्याख्यानाचा कार्यक्रम, 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन, व्याख्यान, चर्चासत्र, 18 एप्रिल रोजी संविधान जागरण आदी कार्यक्रम यानिमित्ताने घेण्यात आले आहेत.