नांदेड ते लातूर, औसा, सोलापूर, विजापूर व परत नांदेड येताना याच मार्गे असा हा प्रवास झाला. डॉ. चव्हाण हे पक्षी अभ्यासक असल्याने ‘पक्षी आधिवास संरक्षण व जतन’ हा संदेश देण्यासाठी व ‘सायकल येत्या काळाची गरज’, ‘सायकल चालवा इंधन वाचवा’, ‘सायकल चालवा पर्यावरण वाचवा’, ‘सब बिमारी का एक ही हल: सायकल’ हे विविध संदेश समाजात पोहोचवणे हा सुद्धा या सायकल परीक्रमेचा हेतू होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व त्याला लागून आलेल्या सुट्ट्यांचा सदउपयोग करून दि १४ ते १७ एप्रिल दरम्यान या दोन सायकल स्वारांनी हा उपक्रम पूर्ण केला.
विविध इंधनाच्या किमती वाढतच आहेत व त्यांचा आंतरराष्ट्रीय अर्थकारणांशी संबंध आहे. सरकार, शासन कोणत्याही पक्षांचे असले तरीही इंधनाच्या किमती ह्या आतापर्यंत वाढतच असलेल्या आहेत व पुढेही वाढतच राहणार असे दिसत आहे. त्यामुळे यापुढे सर्वसामान्य माणसाला सायकल वापरावीच लागेल असे या दोन सायकल स्वारांच म्हणणं आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या वेळेचे नियोजन करून जास्तीत जास्त व जिथे शक्य आहे तेथे सायकलचा वापर करावा जसे की, घरून शाळा-कॉलेजात जाणे-येणे, शिकवणी वर्गाला जाणे, मित्राकडे जाणे इ. साठी सायकलचा वापर शक्य आहे. तसेच शहरांतर्गत कामासाठी प्रौढांनी सायकल वापरावी उदा. भाजी आणणे, ऑफिसला जाणे, छोट्या छोट्या गरजांसाठी स्वंचलित वाहनाएैवजी सायकल वापर शक्य आहे. त्यामुळे आपोआप व्यायाम होईल व वेगळा वेळ देऊन व्यायामाची गरज भासणार नाही अशी विनंतीवजा अपेक्षा या सायकल प्रेमींनी व्यक्त केली.
लांब पल्ल्याच्या सायकलिंगमध्ये सोबत कोणतीही मदत न घेता अतिशय मोजक्या साधनांचा वापर करून प्रवास पूर्ण करणे हे खूप कठीण काम असतं तरीही या दोघांनी ८०० कि.मी.च अंतर सायकल वापराचा प्रसार, प्रचार व पर्यावरण रक्षणाच्या संदेशासाठी पूर्ण केला. पहाटेच्या ४ ते सकाळी ११ पर्यंत व दु. ४ ते रात्री १२ या कालावधीत सायकलिंग व उरलेल्या वेळेत आराम आणि झोप अशा पद्धतीने हा प्रवास झाला. प्रवासात ज्या गावात-शहरात जे उपलब्ध अन्न-पाणी, निवारा असेल अशा साधनांचा वापर यांनी केला. कोणत्याही प्रकारचं बॉटलबंद अन्न, थंडपेय, पाणी या सायकलविरांनी वापरले नाही.
सर्वसामान्य जनता जे पाणी पिते उदा. माठातले, हंड्यातलं, कॅनमधलं आणि जी भाजी-रोटी, भात-चटणी, इडली-वडा असे अन्न घेतलं. कुठेही मांसाहार केला नाही अस प्रांजळ मत त्यांनी व्यक्त केलं. कदाचित यामुळेच की काय या दोघांचीही तब्येत बिघडली नाही असेही ते म्हणाले, आळस घालवण्यासाठी, जगण्याची नवी उमेद मिळवण्यासाठी एक नवी पॉझिटिव्ह ऊर्जा मिळण्यासाठी जनतेला जगण्याच नव प्रोत्साहन देण्यासाठी मानसिक व शारीरिक आरोग्य जपण्यासाठी, शारीरिक कणखरतेसाठी, इंधन बचतीसाठी व अशा एक-न-अनेक फायद्यासाठी कोणत्याही वयाच बंधन न ठेवता व निसंकोचपणे सर्वांनी सायकल चालवावी अशी विनंती या सायकल स्वारांनी व्यक्त केली.
या त्यांच्या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे यांच्यासमवेत विद्यापीठातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रा. डॉ. शिवाजी चव्हाण यांचे अभिनंदन केले. तसेच बार कौन्सिल नांदेड, नांदेड वकील संघाकडून नांदेड सायकलिस्ट असोसिएशनकडून अॅड. भगवान मंगनाळे यांचेही अभिनंदन करण्यात आले.