मुंबई| मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना धमकीचा फोन आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांनी मिशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे. त्यांच्या त्या अल्टिमेटमला काही मुस्लिम संघटनांनी विरोध केला आहे. तरीही राज ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. राज ठाकरे यांनी आता हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला असून, त्यांच्या मुद्द्यावरुन आता त्यांना धमकीचे फोन येत असल्याची माहिती मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
या धमकीचे फोन पाहता राज ठाकरे यांना z+ दर्जाची सुरक्षा द्यावी, अशी मागणी मनसेकडून केली जात आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवर असणाऱ्या भोंग्यावरुन बोलल्यापासून त्यांना धमकीचे फोन येत आहेत, अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. तसेच राज ठाकरेंच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर त्यांच्यावर चर्चा करुन योग्य निर्णय घेऊ, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे. राज ठाकरेंना आलेल्या धमकीचे मेसेज आपण स्वत: वाचले असल्याचा दावा देखील नांदगावकर यांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ठाकरेंना धमकीचे फोन आणि मेसेज येत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मनसेची उद्या महत्त्वाची बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीत राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ होण्याची मागणी करण्याबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो. राज ठाकरेंना केंद्र सरकार सुरक्षा पुरवणार..? राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत केलेल्या विधानापासून ते सतत चर्चेत आहेत. त्यांनी कालच्या पुण्यातील पत्रकार परिषदेतही तीच भूमिका कायम ठेवली. तसेच आपण अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती दिली.
या सगळ्या घडामोडी पाहता केंद्रीय गृहमंत्रालयाने राज ठाकरे यांचा सुरक्षेचा विचार केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या आधी त्यांना केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरवली जाण्याची शक्यता आहे. राज ठाकरे ५ जूनला अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या आधी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून त्यांना विशेष सुरक्षा पुरवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे अयोध्येला जाणार तेव्हा उत्तर प्रदेश सरकारकडूनही त्यांना विशेष सुरक्षा पुरवली जाणार आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी अयोध्येला मोठा फौजफाटा तैनात राहणार असल्याची शक्यता आहे.