महागाई, इंधनदरवाढी वरून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी भोंग्याचा वाद
मुंबई| केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. देशात महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगारांचे प्रश्न हाताळण्यास मोदी सरकार कुचकामी ठरले आहे. केंद्र सरकारचे हे अपयश झाकण्यासाठीच हिंदू-मुस्लीम वाद उकरून काढलेला आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारे धार्मिक तेढ निर्माण करु पाहणाऱ्या नेत्यांच्या सभांना राज्य सरकारने परवानगी देऊ नये, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
प्रसार माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, इंधनदरवाढ, महागाईवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी धार्मिक मुद्दे पुढे करून वातावरण बिघडवण्याचे षडयंत्र असून जे लोक राज्यातील सामाजिक एकोपा, शांतता, सौहार्द संपवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. संविधानाने प्रत्येकाला त्यांच्या धर्माचे पालन करण्याचे, पूजा, प्रार्थना करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. मी हिंदू आहे आणि दररोज हनुमान चाळीसा म्हणतो पण त्याचा कधी गाजावाजा करत नाही. प्रार्थना करण्यासाठी आम्हाला कोणाच्या परवानगीची गरज नाही. आम्ही सर्वधर्म समभावाच्या आणि सर्व धर्म ही तेच सांगतात. जे लोक दुसऱ्यांच्या धर्मावर टीका करत आहेत ते संविधानाला मानत नाहीत.
धार्मिक द्वेष पसरवून मुख्य मुद्द्यापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवणे हाच भाजपाचा अजेंडा आहे पण त्यांच्या अजेंड्याला जनता बळी पडणार नाही. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला देशभरात एकही जागा जिंकता आलेली नाही. भाजपाचे षडयंत्र जनतेला समजले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता नाना पटोले म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना याआधी सुपारीबाज म्हटले होते. आता राज ठाकरे यांनी कोणाची सुपारी घेतली आहे हे देवेंद्र फडणवीसच सांगू शकतील. दिल्ली, उत्तराखंड, उत्तर प्रदेशात कायदा हातात घेऊन दंगली घडवण्यात आल्या, त्यात कोण लोक होते हे सर्वांनी पाहिले आहे. असे प्रकार करण्याचे प्रयत्न महाराष्ट्रातही झाले परंतु महाराष्ट्रातील सक्षम सरकारने त्यांचे हे मनसुबे उधळून लावले. राज्य सरकारने सर्व धर्माच्या धर्मगुरुंना बोलावून चर्चा करावी व योग्य तो मार्ग काढावा आणि महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या धर्माच्या ठेकेदारांवर कारवाई करावी, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.