नांदेड| कायापालट सारखा एक आगळा वेगळा उपक्रम भारतात पहिल्यांदाच गेल्या तेरा महिन्यापासून धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर हे राबवित असून, सोमवारी नांदेड मध्ये सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून रस्त्यावर फिरणाऱ्या भ्रमिष्ट, बेघर, भिकारी, कचरा वेचणा-या वेगवेगळ्या ३४ एकत्रित करून त्यांचा कायापालट करण्यात आला.
समाजातील सर्वात दुर्लक्षित असलेल्या घटकांना एकत्र करुन त्यांना स्वच्छ अंघोळ घातली जाते. तसेच या सर्व व्यक्तींची कटिंग दाढी करणे, नवीन पॅन्ट ,शर्ट ,अंडरपॅन्ट ,बनियन देणे, चहा फराळ देणे आणि हे सर्व करण्यासाठी त्यांनी तयारी दर्शवावी यासाठी शंभर रुपयाची बक्षीसी देणे इत्यादी उपक्रम कायापालटच्या माध्यमातून दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर व त्यांची टीम निरपेक्ष भावनेने या सर्व गोष्टी स्वतः करून घेतात. संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे ' जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले..देव तेथेची ओळखावा ,साधू तेथेची जाणावा ...'हेच ध्येय समोर ठेवून गेली एक वर्ष हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे.
नुकतेच या उपक्रमाने तेराव्या महिन्यांमध्ये पदार्पण केले आहे. भाजपा महानगर नांदेड, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल व अमरनाथ यात्रा संघ नांदेड यांचा संयुक्त उपक्रम आहे. लायन्स क्लब नांदेड सेंट्रल चे सचिव अरुणकुमार काबरा, भाजप सक्रिय सदस्य कामाजी सरोदे , लायन्स सहसचिव सुरेश शर्मा यांनी नांदेड शहरात रस्त्यावर फिरणाऱ्या भ्रमिष्ट, बेघर, भिकारी, कचरा वेचणा-या व्यक्तींना कारमध्ये आणून एकत्रित केले.स्वयंसेवक बजरंग वाघमारे यांनी केली सर्वांची कटिंग, दाढी करून या कार्यातील आपला महत्त्वाचा वाटा उचलला आहे.
बालाजी मंदिराचे महंत कैलास महाराज वैष्णव यांच्यातर्फे नेहमीप्रमाणे स्नानाची उत्तम व्यवस्था करण्यात आली. गेल्या कित्येक महिन्यांपासून अंघोळ न केलेल्या बेघरांचा कायापालट करण्याचा हा सामाजिक प्रकल्प निश्चितच दिलीप ठाकूर यांच्या पुढाकाराने यशस्वी होत आहे. कायापालट झालेल्या अनेकांच्या डोळ्यांमध्ये कृतार्थतेचे मुक अश्रू यानिमित्ताने गोळा झाले. या सर्वांनी दिलीप ठाकूर व त्यांच्या टीम विषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी सुमनशंकर चौधरी, विलास नहारे यांनी घेतले परिश्रम घेतले. पुढील महिन्याच्या पहिल्या सोमवारी हा उपक्रम होणार असल्यामुळे अशा प्रकारच्या व्यक्ती आढळल्यास कृपया मे महिन्याच्या पहिल्या रविवारी त्याची माहिती भाजप अथवा लायन्सच्या सदस्यांना द्यावी असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
