नांदेड| लोहा तालुक्यात शाळापूर्व तयारी जोरात चालली असून बैलगाडी यात्रा, वाजत-गाजत फेऱ्या आणि भव्य मेळाव्यांद्वारा पालकांमध्ये जाणीव जागृती करण्यात येत आहे. तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के आणि नांदेड जिल्हा परिषदेचे सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ. विलास ढवळे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरबळ, पोखरी व पोखरभोसी येथील शाळांना भेटी देऊन शाळा पूर्वतयारीच्या महोत्सवात त्यांनी सहभाग घेतला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरबळच्यावतीने प्रवेश पात्र विद्यार्थ्यांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाचे संचालन करत रॅली काढली. सबंध गावातील मुख्य रस्त्यावर फेरी काढण्यात आली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुकाराम शिंदे, द्रोपदाबाई शिंदे, संतोष शिंदे, अवधूतराव पाटील, मालनबाई पाटील, पालक यात सहभागी झाले होते.
पोखरी येथे इयत्ता पहिलीत प्रवेशासाठी पात्र असणारे विद्यार्थी आणि इतर इयत्ता मध्ये प्रवेश होणाऱ्या विद्यार्थ्यांची बैलगाड्यांमधून शाळेत रॅली काढण्यात आली. गावातील मुख्य रस्त्यावरून रॅली जात असताना शिक्षकांनी व पालकांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोपाळराव हुसेकर, कैलास ताटे मुख्याध्यापक कौसल्ये यांनी या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते. यावेळी गट शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के आणि विलास ढवळे यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.
पोखरभोसी येथील शाळेत बैलगाडी यात्रा आणि भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलास पाटील, छावाचे योगेश ताठे, मुख्याध्यापक मुळे आदींनी या मेळाव्यासाठी भरीव योगदान दिले. सबंध गावभर शैक्षणिक वातावरण तयार करण्यात आले होते. विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची स्टॉल्स उभे करण्यात आले होते तसेच दोन महिन्यात शाळा सुरू होण्यापर्यंत मुलांचा अभ्यास मागे पडूनये यासाठी मुलांना शैक्षणिक साहित्य शासन स्तरावरून देण्यात आले आहे. त्याचे वितरण करून मुलांच्या सुट्टी मध्ये मुलांच्या सानिध्यात राहून त्यांचे अध्ययन मागे पडणार नाही याबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांनी केले आहे. त्याला अनुसरून संपूर्ण शाळांमध्ये पालकांना साहित्याचे वितरण करण्यात आले.
हरबळ, पोखरी आणि पोखरभोसी या गावांमध्ये उत्तम शालेय वातावरण निर्मिती झाली आहे. विद्यार्थ्यांना वैश्विक पातळीवर खूप मोठ्या संधी असून गाव शिव ओलांडून नव्या संधींचा शोध घ्यावा असे आवाहन डॉ. विलास ढवळे यांनी केले तर रवींद्र सोनटक्के यांनी शाळा पूर्वतयारीच्या मेळ्यांमधून सकारात्मक जनजागृती झाली आहे, असे सांगितले. लोहा गटाचे विषय तज्ञ संजय अकोले, केंद्रप्रमुख आढाव यांची यावेळी उपस्थिती होती.