नांदेड/वाकोडी| अनेक नावीन्यपूर्ण संकल्पना व विविध उपक्रमांसह होणारे पहिले मराठी साहित्य संस्कार संमेलन भरविण्याचा मान हिंगोली जिल्ह्यातील डोंगराळ भागातील वाकोडी या गावास मिळत आहे.
इसाप प्रकाशनद्वारा संचालित मराठी साहित्य संस्कार मंडळ व गावकऱ्यांची बैठक वाकोडी येथे या मंडळाचे संस्थापक व प्रसिद्ध साहित्यिक, प्रकाशक दत्ता डांगे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. ग्रामीण भागातील साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, ग्रामीण जनतेस साहित्य संमेलन म्हणजे काय व ते कसे असते हे कळावे, शालेय विद्यार्थ्यांसाठी लेखन, चित्रकला, कथाकथन स्पर्धा घेऊन, बक्षिसे देऊन त्यांच्यातील चित्रकार, लेखक घडवावा, तसेच वाङ्मयीन पुस्तके वाचण्यात विद्यार्थी व गावकरी यांचा उत्साह अधिक वाढावा यासाठी या संमेलनाचे आयोजन असल्याचे दत्ता डांगे यांनी सांगितले.
हे संमेलन 'साहित्यिकांच्या गावात साहित्य संमेलन' या उपक्रमांतर्गत भरत आहे. या गावातील नामवंत व ज्येष्ठ साहित्यिक विजय गं. वाकडे यांचा यानिमित्ताने गौरव करता यावा, साहित्यिकांच्या या गावाचे दर्शन दूरवरून येणारे साहित्यिक, रसिक यांना घेता यावे, ग्रामसंस्कृती जवळून पाहता यावी आणि गावकऱ्यांना-विद्यार्थ्यांना साहित्यिकांशी संवाद साधता यावा या हेतुने हे संमेलन भरत आहे.
साहित्य संमेलनात 'सत्कार्याचा दीप', 'घरोघरी ग्रंथशिदोरी' आदी उपक्रम घेण्यात येणार आहेत. या बैठकीस प्रसिद्ध साहित्यिक प्रा. नारायण शिंदे, आनंद पुपलवाड व उपसरपंच शिवाजीराव भवर, मुख्याध्यापिका ओममाला जाधव, प्रतापराव देशमुख, सुदर्शन व्हंगले, गौतम ढोले, रेखा भरडे, गायत्री गोस्वामी पांडुरंग कपाटे, दिलीप रामपुरे, बालाजी काकडे, गजानन मिरटकर, आदी उपस्थित होते.
गावात पहिल्यांदाच होणाऱ्या या मराठी साहित्य संस्कार संमेलनास उदंड प्रतिसाद मिळत आहे. तरी मराठवाडा व विदर्भातील साहित्यिक व रसिकांनीही आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन उपसरपंच शिवाजीराव भवर व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.