नांदेड| पं. दीनदयाल उपाध्याय स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या नांदेड भूषण वर्ष २०१९ चा पुरस्कार नवज्योत फाउंडेशन च्या माध्यमातून हजारो बालकांवर संस्कार घडविणारे शीख युवक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष नवनिहालसिंघ जहागीरदार यांना १४ व १५ मे रोजी होणाऱ्या नरेंद्र - देवेंद्र महोत्सवात देण्यात येणार असल्याची घोषणा स्वागताध्यक्ष डॉ. सचिन उमरेकर व संयोजक धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी केली आहे.
स्वातंत्रसैनिक गुलाबसिंघ जहागीरदार यांचे सुपुत्र असणारे नवनिहालसिंघ यांनी विद्यार्थीदशेपासून सामाजिक कार्याला सुरुवात केली. शिख विद्यार्थी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष या नात्याने त्यांनी औरंगाबाद आकाशवाणी केंद्रावरून गुरुवाणी किर्तन प्रक्षेपित करण्यास भाग पाडले. शिख युवक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या नवनिहालसिंघ यांच्या पुढाकारातून २६ वर्षापासून गुरुद्वारा बोर्डाच्या मार्फत सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात येते.त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक व वेळेची बचत होत आहे. आत्तापर्यंत शेकडो विवाह संपन्न झाले आहेत. गोदावरी जल शुद्धीकरण व्हावे यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून कामाला चालना दिली. वर्ष २००६ मध्ये नवज्योत फाउंडेशनची स्थापना करून गेल्या १६ वर्षापासून विविध उपक्रमाचे आयोजन सातत्याने करण्यात येत आहेत. त्यामध्ये सतरा रक्तदान शिबिराच्या माध्यमातून चार हजार पेक्षा जास्त रक्ताच्या बाटल्या संकलित करण्यात आल्या.
दरवर्षी व्यवसाय मार्गदर्शन शिबिराच्या मार्फत तरुणांना योग्य मार्गदर्शन करण्यात येते. देशात सद्यस्थितीत चर्चेत असलेल्या विविध विषयावर दरवर्षी निबंध स्पर्धा घेऊन जनजागृती करण्यात येते. विद्यार्थ्यांना जगात काय चालले याची माहिती व्हावी यासाठी सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषाचे आयोजन सातत्याने करण्यात येते. दर वर्षी ३०० बालकांचे संस्कार शिबिर आयोजन करण्यात येते. या शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी देशातील प्रख्यात विचारवंतांना आमंत्रित करण्यात येते. या संस्कार शिबिराच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो बालकांना संस्कारित करण्यात आले आहे. गुरुग्रंथ साहिब एक अवलोकन या विषयावर मनपा सोबत नवज्योत फाउंडेशनने सेमिनारचे आयोजन केले.
गुरुद्वारा बोर्डाचे सदस्य,रेल्वे सल्लागार समिती सदस्य, शांतता समिती सदस्य, विशेष कार्यकारी दंडाधिकारी, पर्यटन विकास उत्सव समिती सदस्य म्हणून नवनिहालसिंघ यांनी यशस्वी कार्य केले आहे. नुकतेच ते नांदेड एज्युकेशन सोसायटी वर निवडून आले असून पीपल्स हायस्कूल चे शिक्षण समिती अध्यक्ष म्हणून कार्य करीत असताना शाळेची नवीन इमारत बांधकामासाठी निधी जमा करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.२००८ वर्षापासून महेश अर्बन बँकेचे संचालक या नात्याने अनेक गरजू तरुणांना कर्ज देऊन स्वतःच्या पायावर उभे केले आहे.
गुणीजन गौरव पुरस्कार, यशवंतराव चव्हाण सेवाभावी पुरस्कार, कार्य गौरव पुरस्कार, सत्यशोधक विचार मंच सामाजिक पुरस्कार यासारखे अनेक पुरस्कार नवनिहालसिंघ यांना यापूर्वी मिळालेले आहेत. या सर्व कामाची दखल घेऊन रोख रु. ५०००, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व महावस्त्र देऊन नांदेड भूषण पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते नरेंद्र- देवेंद्र महोत्सवात सन्मानित करण्यात येणार आहे. काही अपरिहार्य कारणामुळे चार वर्षापासून पुरस्काराचे वितरण करण्यात आले नव्हते.
आता कोरोनाचे निर्बंध उठल्यामुळे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर व भाजप जिल्हाध्यक्ष प्रविण साले यांच्या मार्गदर्शनाखाली नरेंद्र- देवेंद्र महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. देशातील नामवंत कवींना व हास्य कलाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी दोन दिवस उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.