हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील सावंगी येथील मोलमजुरी करून जगणाऱ्या शेतकरी कुटुंबातील रुख्मिणीबाई परमेश्वर गरुड यांना वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी गंभीर अश्या छातीच्या कर्करोगाने ग्रासले , कँसर सारखा गंभीर आजार झाल्यामुळे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबावर अचानक झालेल्या आघातामुळे दुःखाचा डोंगर कोसळला .त्यांच्या परिवारात ४ मुली पती - पत्नी एवढेच सदस्य असल्याने दोघेही मजुरी करून कुटुंबाचा भार उचलत होते .
आजाराचे निदान झाल्यानंतर पती परमेश्वर यांनी नांदेड पासून, मुंबई , हैद्राबाद, पर्यंतची सर्व हॉस्पिटल पालथी घालून उपचारासाठी शर्तीचे प्रयत्न केले. शेवटी औरंगाबाद येथील सिग्मा हॉस्पिटल मध्ये यावर खात्रीशीर उपचार करण्यात येतील असे सांगण्यात आल्यावर त्यांनी त्याठिकाणच्या डॉक्टरांना दाखविले . डॉक्टरांनी उपचारासाठी १० लाख रुपये खर्च येईल असे सांगितले . एवढा पैसा आणायचा कुठून या विचाराने परमेश्वर यांच्या डोळ्यासमोर अंधार पसरला .
याच दरम्यान जवळच्या नातेवाईकांकडून पंतप्रधान राहत कोषाची माहिती मिळाली आणि यासाठी लोकप्रतिनिधींची शिफारस लागत असल्यामुळे त्यांनी खासदार हेमंत पाटील यांच्याशी संपर्क साधला. खासदार हेमंत पाटील यांनी तातडीने सर्व यंत्रणा कामाला लावून खासदार हेमंत पाटील यांच्या कार्यालयाकडून कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आणि अवघ्या १ महिन्यात रुख्मिणीबाई यांच्या उपचारासाठी २ लक्ष ९२ हजार ५०० रुपयाचा निधी प्राप्त झाला . व त्यांच्यावर सिग्मा हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु झाले. अजूनही त्यांच्या अनेक तपासण्या करण्यात येत असून आजार वाढण्याचा धोका मात्र योग्यवेळी मिळालेल्या उपचारामुळे टाळला आहे . रुख्मिणीबाई सध्या आपलया कुटुंबासोबत राहून वेळोवेळी तपासण्या करून उपचार घेत आहेत . कर्करोग , हृदयाची अवघड शस्त्रक्रिया, किडनीचा आजार, रक्ताचा कर्करोग असे गंभीर आजार सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला झाल्यास त्याना खरंच खूप मोठी आर्थिक अडचण निर्माण होते अनेकवेळा शेती किंवा जवळचे सर्व विकून उपचार केले जातात.
प्रधानमंत्री राहत कोषातून रुग्णाला जी थेट मदत दिल्या जाते यामुळे देशभरातील लाखो रुग्णाचे आजवर प्राण वाचले आहेत . खासदार हेमंत पाटील यांनी लोकप्रतिनिधी झाल्यापासून आपल्या मतदारसंघातील रुग्णांना कोणतीही आरोग्य मदत करता यावी यासाठी सर्वप्रथम आरोग्ययंत्रणा सक्षम केली असून त्यावर पूर्णवेळ काम करण्यासाठी आरोग्यदूताची नेमणूकहि केली आहे . त्यामाध्यमातून आजवर अनेक गरजू रुग्णांना प्रधानमंत्री राहत कोष , मुख्यमंत्री सहायता निधी , सिद्धिविनायक ट्रस्टकडून मिळणारी आर्थिक मदत , धर्मादाय रुग्णालयात केले जाणारे मोफत उपचार याची मदत करण्यात आली असून हे कार्य अहोरात्र आजही चालू आहे .