अर्धापूर, निळकंठ मदने| तालुक्यात सद्यस्थितीत तापमानाचा पारा वाढला असून सकाळी आठपासूनच उन्हाचे चटके जाणवत आहे. एप्रिलमध्येच मे महिन्यातील स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पिकांवर तापमानाचा परिमाण जाणवत आहे. मोठ्या प्रमाणात केळी पिकावर तापमानाचा परिमाण होत असल्याचे दिसून येत आहे. या परिस्थितीत केळीच्या बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना धडपड सुरू आहे.
लोडशेडिंगमुळे होतोय त्रास - अर्धापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळी पिकाची लागवड केली आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे केळीच्या दरात घट झाली होती. या वर्षात केळीला मागणी वाढल्याने आणि केळीच्या दरात वाढ झाल्याने शेतकरी समाधानी असताना तापमानामुळे आणि लोडशेडिंग वाढल्याने केळी वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना धडपड करावी लागत आहे. केळी पिकाला उन्हाळ्यात नेहमीच पाण्याची गरज असते मात्र लोडशेडिंगमुळे केळीला ताण पडत आहे. एकीकडे तापमानाचा फटका तर दुसरीकडे लोडशेडिंग असल्याने केळीला फटका बसत आहे .
तापमानाचा कमी होईना - उष्णतेचा कहर एप्रिल अखेरपर्यंत कायम राहील असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला आहे. तालुक्यात तापमानाचा पारा ४१ ते ४२ अंश पोहोचला आहे. याचा परिणाम केळी पिकांवर होऊ लागला आहे. यामुळे केळीचे घड काळे पडले सुरू झाले आहेत. काही शेतकऱ्यांची केळीचे घड कापणीस आले आहेत. त्यांच्या वजनात घट झालेली दिसत आहे.
बागेच्या बाजूभोवती कुंपण व गवत - तापमाना पासून केळीचा बचाव करण्यासाठी नवनवीन प्रयोग केले जात आहे. काही शेतकऱ्यांनी केळीच्या बागेच्या चारीबाजूनी साड्याचे कुंपण लावले आहेत तर काही शेतकऱ्यांनी गजरा गवत लावले आहे. तरीपण केळीवर तापमानाचा परिणाम जाणवत आहे .
तापमानात वाढ होत राहिल्यास बसणार फटका? पुढील महिन्यात तापमानात आणखी वाढ झाली तर केळीसह इतर पिकांवरील विपरीत परिणाम होईल आणि शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. तापमानामुळे केळीवर होणारा परिणाम शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनला असून तापमानामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.