आई - मुलगा सुखरूप; कुटुंबाना झाला आंनद
हिमायतनगर, अनिल मादसवार| रेल्वे गाड्यांमधून प्रवास करतेवेळी आतापर्यंत बहुतांश महिलांनी नवजात बालकांना जन्म दिल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना भोकरहुन प्रवास करणाऱ्या महिलेसोबत हिमायतनगर जवळ घडली असून, सदर महिलेने परळी ते आदिलाबाद जाणाऱ्या रेल्वेत आज दि.२७ एप्रिल बुधवारी ११ वाजेच्या सुमारास घडली असून, सदर महिलेने पाऊणे तीन किलो वजन असलेल्या एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सध्या बाळ आणि आई दोघेही सुखरूप आहेत.
नाजुकाबाई अनिल कवडेकर वय ३० वर्ष रा.बटाळा ता.भोकर हि महिला आपल्या पतीसह २ मुलींना घेऊन पेसेंजर रेल्वेने भोकरहून बोधडी येथे माहेरला जात होती. दरम्यान थेरबन समोर रेल्वे गाडी येताच गर्भवती महिलेला लेबर पेन म्हणजे प्रसूती कळा जाणवू लागल्या होत्या. याच डब्ब्यात इस्लापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. प्रदीप शिंदे देखील प्रवास करत होत. हा प्रकार त्यांच्या लक्षात आल्याने अन्य पेसेंजर महिलांच्या मदतीने सदर महिलेची रेल्वेतच डिलेव्हरी झाली. यात गर्भवती महिलेने गोंडस बालकाला जन्म दिला.
परळी ते आदिलाबाद जाणारी रेल्वे हिमायतनगर येथील स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर येताच नागरिकांच्या मदतीने प्रसूत झालेली महिला, नवजात बालकास हिमायतनगर रेल्वे स्थानकावर उतरून ऑटोने येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. रक्तस्त्राव होत असल्याने येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रसाद मामीडवार आणि सिस्टर व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ प्रसूती झालेल्या महिलेस रुग्णालयात दाखल करून घेऊन उपचार केला. आता आई व मुलगा दोघेही सुखरुप आहेत. तंदुरुस्त बाळाला जन्म दिल्याने बाळाची आई नाजुकाबाई आणि वडील अनिल दोघांनाही आनंद झाला आहे.