कोविड-19 च्या अनुषंगाने लागू केलेले निर्बंध मागे - नव्या मार्गदर्शक सूचना निर्गमीत -NNL


नांदेड, अनिल मादसवार| 
कोविड-19 रुग्णांची कमी झालेली संख्या व आरोग्य सुविधेवरील कमी झालेला ताण तसेच कोविड-19 च्या प्रतिबंधाच्या अनुषंगाने सध्याची स्थिती नियंत्रणात आहे. या अनुषंगाने राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा दंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्ह्यात करावयाच्या कार्यवाहीबाबत पुढीलप्रमाणे आदेश निर्गमीत केले आहेत.    

नांदेड जिल्ह्यात कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये निर्गमीत केलेल्या आदेशान्वये लागू केलेले सर्व निर्बंध याद्वारे 1 एप्रिल 2022 रोजीच्या मध्यरात्रीपासून मागे घेण्यात आले असून ते पुढे अंमलात राहणार नाहीत.

कोविड-19 चे व्यवस्थापन व प्रतिबंधाचे अनुषंगाने भारत सरकार कडील 22 मार्च आणि 23 मार्च 2022 रोजीच्या पत्रान्वये देण्यात आलेले मार्गदर्शक सूचना सर्व संबंधित अधिकारी, स्थानिक प्रशासनाने तंतोतंतपणे पालन करावे.

जिल्ह्यातील सर्व नागरिक, आस्थापना व संस्थांनी कोविड अनुरुप वर्तनाचे (ज्यामध्ये मास्कचा वापर, सामाजिक अंतराचे पालन आदीचा समावेश आहे) पालन करावे, कारण ते व्यक्ती आणि समाजाचे आरोग्य व सुरक्षेसाठी सर्वात मोठी ढाल म्हणून कार्य करते.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने साथरोगाच्या उद्रेक याबाबत विविध परिमाणे जसे प्रतिदिवशी आढळून येणाऱ्या नविन रुग्णांची संख्या, उपचाराधिन रुग्णांची संख्या (ॲक्टीव्ह केसेस), बाधित रुग्णसंख्येचा दर (पॉझिटीव्हीटी रेट) तसेच दवाखान्यात उपराधिन रुग्णांसाठी वापरात असलेल्या विविध प्रकारच्या खाटांची संख्या याबाबत दक्ष रहावे.

कोणत्याही परिस्थितीत रुग्णसंख्येचा कल यावरुन साथरोगाचा पुनश्च प्रादुर्भाव होण्याची स्थिती निर्माण होत असल्याचे दिसून आल्यास त्याबाबत राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात तात्काळ कळविण्यात यावे. जेणेकरुन साथरोगाचा पुन:श्च प्रादुर्भाव सुरुवातीच्या टप्प्यातच रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुरु करण्यात येतील.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व राज्य शासनाचे सर्व संबंधित विभागाचे अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांचे कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना व जनजागृतीचे कार्यक्रम चालू ठेवावेत, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 31 मार्च 2022 रोजी निर्गमीत केले आहेत.

 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी