कृषी उद्योगातील गैरव्यवहार टाळण्यासाठी टॅली सॉफ्टवेअरद्वारे ऑडिट - दादाजी भुसे -NNL


मुंबई|
महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, अहमदनगर या कार्यालयाकडून 2012 ते 2017 या कालावधीत 1 कोटी 20 लाख 98 हजार रूपयांचा अपहार झाल्याचे निदर्शनास आले असून यात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या तीन अधिकारी-कर्मचाऱ्यांवर आर्थिक गुन्हे अन्वेषण, अहमदनगर यांच्यामार्फत एफ.आय.आर. दाखल करण्यात आला असून त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. 

या प्रकरणी काही कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवरही कार्यवाही करण्यात येणार आहे. भविष्यात अशा प्रकारच्या अडचणी उद्भवू नये, यासाठी सर्व महाराष्ट्रात टॅली या आज्ञावलीद्वारे ऑडिट करण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

या प्रकरणी हलगर्जी करणाऱ्या 21 अधिकारी-कर्मचारी यांना विभागामार्फत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून दोषी सेवानिवृत्ती अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. वितरक व लाभार्थी ग्राहकांकडून येणाऱ्या रकमेच्या अफरातफरीप्रकरणी कोणत्याही निरपराध कर्मचाऱ्यांवर कार्यवाही केली जाणार नाही याची काळजी घेतली जाईल. या अपहार प्रकरणी 15 दिवसांच्या आत कृषी आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येईल, असे श्री.भुसे यांनी सांगितले.

या रक्कम अपहारात 15 लाख  30 हजार रूपये एका लिपिकांकडून वसूल करण्यात आले आहे. दोन कर्मचारी हे न्यायालयात गेले असून याबाबतची वस्तुस्थिती न्यायालयात भक्कमपणे मांडण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी सांगितले. यासंदर्भात विधान परिषद सदस्य सर्वश्री अमोल मिटकरी, चंद्रशेखर बावनकुळे, अभिजित वंजारी यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी