यावर्षी प्रथमच हृदय विकार व अस्थि विकारावरही उपचार
नांदेड,अनिल मादसवार| येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने व जयवकील फाउंडेशन, बीजे वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रेन मुंबई, कमल उडवाडिया फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने गत ११ वर्षापासून मेंदूचे विकार असणाऱ्या मुला-मुलींसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते. या शिबिराचा हजारो रुग्णांना फायदा झाला असून हे शिबीर या रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. या वर्षी शिबिराचे हे बारावे वर्ष असून हे एकविसावे शिबीर गुरुवार दिनांक २४ ते २६ मार्च या कालावधीत मगनपुरा, नवा मोंढा येथील आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात आयोजित करण्यात आले आहे.
शहराच्या मगनपुरा, नवा मोंढा भागातील आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात मेंदूचे विकार असणाऱ्या मुला-मुलींसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात रविवार दिनांक २० मार्च रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा यांनी आत्तापर्यंतच्या आरोग्य शिबिरात किती रुग्णांवर उपचार, शस्त्रक्रिया करण्यात आली व किती रुग्णांना याचा लाभ झाला याची विस्तृत माहिती दिली.
आत्तापर्यंतच्या वीस आरोग्य शिबिरात हजारो रुग्णांवर उपचार करण्यात आले. याचा तब्बल ५ हजार रुग्णांना लाभ झाला आहे. नेत्रशस्त्रक्रियेमुळे दृष्टिहीन असलेल्या रुग्णांना दृष्टी मिळाली तर हाडाच्या शस्त्रक्रियेनंतर उभे राहण्यास असमर्थ असणाऱ्या रुग्णांना आता चालता येऊ लागले आहे. अनेक रुग्णांचे चालताना तोल जाणे, फिट्स येणे व ऑटीझम अशा मेंदूशी संबंधित आजारातून सातत्याने आरोग्य शिबिरात घेतलेल्या उपचारामुळे काहींची सुटका झाली आहे तर बहुतेक रुग्ण सुटकेच्या मार्गावर आहेत. हे आरोग्य शिबीर मेंदूचे विकार असणाऱ्या मुला-मुलींसाठी वरदान ठरले आहे. या शिबिरात उपचार घेण्यासाठी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक व तेलंगाना येथील राज्यातूनही मोठ्या संख्येने रुग्ण येत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन जाहीर झाले असल्याने मागील दोन वर्षात आरोग्य शिबिराचे आयोजन करता आले नाही मात्र त्या काळातही आरोग्य शिबिरात उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी मोफत औषधी तसेच धान्याच्या कीटचे वितरण करण्यात आले. या आरोग्य शिबिरात १८ वर्षाआतील हृदय विकार व अस्थि विकार असलेल्या रुग्णांवर उपचार व्हावा अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केल्याने या आजारावर उपचार करणाऱ्या मुंबईच्या तज्ञ डॉक्टरांना बोलावण्यात आले आहे. हृदय रोग/ विकार जसे की, हृदयास छिद्र, हृदयाशी सलग्न विकार, दम लागणे, छातीमध्ये अस्वस्थपणा, वजन कमी होणे, पाय पोट व डोळ्याभोवती सूज येणे, थकवा येणे आदी रुग्ण व अस्थिव्यंग रोग/विकार जसेकी, हात पाय वाकडे असणे, व्यवस्थित चालता न येणे, कात्रीसारखे चालणे, गुडघे आत असणे आदी हाडाशी निगडीत रुग्णांवर तज्ञ डॉक्टर उपचार व आवश्यकते नुसार मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली आहे.
नवीन रुग्णांसाठी पुर्व नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी नवीन रुग्णांनी आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालय, मगनपुरा नवा मोंढा नांदेड येथे प्रत्यक्ष जाऊन नोंदणी करावी तसेच शाळेत येणे शक्य नसणाऱ्या बाहेरगावच्या रुग्णांनी 8208114832, 9067377520 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. प्रतीवर्षाच्या शिबिराप्रमाणे या वेळीही रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होऊ नये यासाठी संस्था पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन व मुख्याध्यापक नितीन निर्मल यांच्या नेतृत्वात आर. आर. मालपाणी मतिमंद व श्रीरामप्रताप मालपाणी मूकबधिर विद्यालयातील कर्मचारी जय्यत तयारी करीत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.